बरेली कॉलेजात अभाविप कार्यकर्त्यांचा धुडगूस

बरेली – उत्तरप्रदेशातल्या बरेली कॉलेजात एका परिसंवादाच्यावेळी कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक चौतीराम यादव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक गोळवलकर गुरूजी आणि विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत तेथे तोडफोड सुरू केली. त्यामुळे हा परिसंवादाचा कार्यक्रम रद्द करावा लागला. या प्रकारामुळे तेथे मोठाच तणाव निर्माण झाला होता. पण पोलिसांची जादा कुमक तेथे पाचारण करून स्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
काल सायंकाळी प्रा. यादव यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अभाविपच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली. बरेली विद्यापीठाचे जेएनयु होऊ देणार नाही असे म्हणत त्यांनी तेथील टेबल खुर्चांची मोडतोड सुरू केली. त्यावेळी आयोजकांनी परिसंवाद रद्द करून प्रा. यादव यांनी संरक्षक कडे करून बाहेर नेले. या प्रकरणी पोलिसांनी प्रा. यादव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की प्रा. यादव यांनी नंतर आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. आपण मोहन भागवत यांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य केले नाही असे त्यांनी नमूद केले. तथापि आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागतो असे त्यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)