बनावट सह्या करून शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक

शिक्रापूर- करंदी (ता. शिरूर) येथे रिलायंस गॅस कंपनीच्या पाईपलाईनच्या कामात शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानभरपाईच्या कागदपत्रांवर बनावट सह्या करून त्या सह्या खऱ्या असल्याचे भासवून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत या जमिनीचे मालक रामराव सुभाणराव मासुळकर (रा. उध्यमनगर शिवनेरी, पिंपरी, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी रिलायंस कंपनीचे सक्षम अधिकारी एल. आर. गोतारणे (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे), एस. डी. भिसे, अभिजित भिंगारे (रा. पुणे), विनोद सुभाष दौंडकर (रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे), नवनाथ बाजीराव दौंडकर (रा. भोसरी पुणे), नंदू भयीरट (रा. न्हावरा, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्यावर फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, करंदी (ता. शिरूर) येथे रामराव मासुळकर (रा. पिंपरी) पुणे यांनी 2005 साली काही शेतजमीन विकत घेतली होती. त्यानंतर 2007 मध्ये त्यांच्या शेतामधून रिलायंस कंपनीच्या गॅस लाईनचे पाईप टाकत असल्याचे दिसले. त्यावेळी मासुळकर यांनी हे काम थांबविले असता त्यांना तेथील रिलायंस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तुमच्या नुकसानीचा पंचनामा होऊन तुम्हाला नुकसानभरपाई मिळेल, असे सांगितले. त्यांनतर त्यांनी त्या ठिकाणी पंचनामा देखील केला. परंतु त्यांनतर त्या शेतकऱ्याला त्यांच्या कार्यालयात बोलावून नुकसानभरपाईच्या काही रकमेचा धनादेश दिला. त्यानंतर आणखी काही रकमेचा दुसरा धनादेश देखील त्यांना 2007 मध्ये देण्यात आला. त्यांनतर 2009 मध्ये जमीनमालक मासुळकर यांना रिलायंस कंपनीकडून त्यांच्या जमीन वापराचे हक्क संपादित केले असून जमिनीच्या नुकसानभरपाईची सर्व रक्कम माणिक ढोकले यांना अदा केली असल्याचे पत्र मिळाले. त्यावेळी मासुळकर यांनी माणिक ढोकले यांच्याकडे चौकशी केली असता ढोकले यांनी नुकसानभरपाईची कोणतीही रक्कम घेतली नसल्याचे सांगत ढोकले यांनी प्रतिज्ञापत्र दिले. त्यांनतर देखील मासुळकर यांनी रिलायंस कंपनीच्या वानवडी येथील कार्यालयात जाऊन चौकशी केली. यावेळी त्यांना या कंपनीचे सक्षम अधिकारी एल. आर. गोतारणे, एस. डी. भिसे, अभिजित भिंगारे तसेच इतर लोकांनी संगनमत करून मासुळकर यांच्या बनावट सह्या करून त्या खऱ्या असल्याचे भासवत कंपनीकडून त्यांचे धनादेश काढून घेत रक्कम घेतली. तसेच मासुळकर यांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)