पुणे- बनावट सहल कंपनीच्या माध्यमातून स्वस्तात विमान तिकिटे देण्याची जाहिरात संकेतस्थळावर करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी राजस्थानातून अटक केली. रतनलाल जति अग्रवाल (वय 30) आणि अमित सिंह (वय 32, दोघे मूळ रा. राजस्थान), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सुषमा शर्मा (वय 52, रा. सागर तरंग, वरळी, मुंबई) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. शर्मा यांना तातडीने अमेरिकेला जायचे होते. विमान तिकिटांची नोंदणी करण्यासाठी त्यांनी सहल कंपन्या आणि त्यांच्या संकेतस्थळांची पाहणी केली होती. त्यावेळी टुकान ट्रॅव्हल्स या कंपनीचे संकेतस्थळ त्यांनी पाहिले. स्वस्तात अमेरिकेची तिकिटांची नोंदणी केली जाईल, अशी जाहिरात संकेतस्थळाच्या माध्यमातून करण्यात आली होती. शर्मा यांनी संकेतस्थळावर असलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.
आरोपी अग्रवाल आणि सिंह यांच्याशी संपर्क साधला. सिंह आणि अग्रवाल यांनी शर्मा यांनी त्वरित पुण्यातील मार्केटयार्ड भागात असलेल्या एका बॅंकेच्या खात्यात साडेतीन लाख रूपये भरण्याची सूचना केली. व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून दोन तिकिटांचे छायाचित्रे पाठवितो, असे दोघांनी त्यांना सांगितले.
चोरट्यांनी दिलेल्या सूचनेनंतर शर्मा यांनी साडेतीन लाख रूपये मार्केटयार्डातील साऊथ इंडियन बॅंकेच्या खात्यात भरले. दरम्यान, दोघांच्या मोबाइल क्रमांकावर शर्मा यांनी संपर्क साधला. तेव्हा मोबाइल बंद असल्याचे निदर्शनास आले. शर्मा यांना तातडीने अमेरिकेला जायचे होते. त्यामुळे त्यांनी टुकान ट्रॅव्हल्स कंपनीबाबत चौकशी केली. तेव्हा अशा प्रकारची कंपनी अस्तिवात नसल्याचे उघडकीस आले. या गुन्हयाचा तपास मार्केटयार्ड पोलिसांकडे सोपविण्यात आला.
त्यानंतर पोलीस उपायुक्‍त प्रकाश गायकवाड यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्‍त मिलींद पाटील, पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार, संजय सातव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गवळी, संदीप जाधव, मंगेश साळुंके, नितीन जाधव, संदीप घुले, अनिस शेख, रूपाली चांदगुडे, निशांत कोंडे यांनी तपास सुरू केला. सहाय्यक निरीक्षक गवळी यांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून दोन आरोपी राजस्थानातील असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने राजस्थानातून सिंह आणि अग्रवाल यांना ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)