बनावट व्यक्ती उभारून न्हावऱ्यात जमीन विकली

शिक्रापूर- न्हावरा (ता. शिरूर) येथील दोन व्यक्तींच्या नावावर असलेली जमीन मूळ मालकाच्या नावाचे बनावट ओळखपत्र बनवून त्या जमिनीचे तळेगाव ढमढेरे येथे खरेदीखत करून परस्पर विक्री केल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत अशोक गजानन चौगुले (रा. उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी या जमिनीचे बनावट कुलमुखत्यार बनविणारे राजू अण्णा चौगुले (रा. जय अण्णा निवास संत जनार्दन स्वामी, अशोकनगर, सातपूर, नाशिक) तसेच त्याने उभी केलेले बनावट तीन अनोळखी व्यक्ती आणि त्यावर सह्या करणारे साक्षीदार यांच्यावर फसवणूकप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादीनुसार, अशोक चौगुले आणि त्यांच्या विनोद चौगुले, विलास चौगुले या चुलतभावांच्या नावावर न्हावरा येथे शेतजमीन आहे. अशोक यांना अचानक त्यांच्या चुलतभावाने फोन करून “तुमची जमीन विजय मोरे यांनी विकत घेतली आहे, असे मला मोरे यांनी सांगितले असल्याचे कळविले. त्यांनतर अशोक यांनी “मी जमीन विकलेली नाही’ असे सांगून शिरूर येथील तहसीलदार कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्या जमिनीचे तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदीखत झाल्याचे समजले. त्यांनतर त्यांनी तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन खरेदीखताची नक्कल घेतली असता राजू अण्णा चौगुले यांनी डिसेंबर 2014 मध्ये त्या जमिनीचे कुलमुखत्यार बनवून घेतले. त्यावेळी अशोक चौगुले आणि त्यांचे चुलतभाऊ उपस्थित नव्हते. त्यावेळी अशोक चौगुले, विनोद चौगुले आणि विलास चौगुले यांच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून तिघांच्या जागेवर बनावट व्यक्ती उभी करून त्या जमिनीचे कुलमुखत्यार बनविले. त्यावर जमिनीच्या मूळ मालकांच्या सह्या देखील नव्हत्या.त्यानंतर त्या कुलमुखत्यारवरून या जमिनीतील काही जमीन भारती युवराज शर्मा (रा. समीर अपार्टमेंट, पंचवटी, नाशिक) यांनी तसेच रोशन विजय मोरे (रा. संत तुकारामनगर केसनंद फाटा, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) यांनी विकत घेतली असल्याचे आढळून आले.
तर यावेळी देखील जमिनीचे मूळ मालक उपस्थित नव्हते. त्यावेळी चौगुले यांच्या लक्षात आले की, राजू अण्णा चौगुले यांनी जमिनीच्या तीनही मूळ मालकांच्या जागेवर तीन बनावट व्यक्ती उभ्या करून तिघांचे देखील बनावट ओळखपत्र बनवून त्याआधारे कुलमुखत्यार बनवून जमिनीचे खरेदीखत करून जमिनीची विक्री केली. दाखल फिर्यादीनुसार संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)