बनावट मोजणी नकाशा; सर्व्हेअरचे सेवा निलंबन

आयुक्‍तांचा आदेश : खातेनिहाय चौकशी करणार

पिंपरी – बनावट सरकारी मोजणीचा नकाशा बनविल्याप्रकरणी नगररचना व विकास विभागाचे सर्व्हेअर सुभाष विठ्ठल खरात यांना सेवा निलंबन करुन खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिका नगररचना व विकास विभागातील सर्व्हेअर म्हणून सुभाष विठ्ठल खरात हे कार्यरत होते. त्यांच्यावर बनावट सरकारी मोजणीचा नकाशा बनविण्यामध्ये प्रमुख सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पिंपरी पोलीस स्टेशनला भा.दं.वि.कलम 420, 465, 466, 468, 471 व 34 या प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 08/2017 फौजदारी स्वरुपाचा 4 जानेवारी 2017 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच, याच गुन्ह्यात खरात यांना अटक होवून न्यायालयीन कोठडी मिळाली. आता ते जामीनावर बाहेर आहेत. मात्र, सध्या गुन्ह्याचा तपास सुरु असून, पिंपरी पोलीस स्टेशनने 5 जूलैला महापालिका अहवाल पाठविला आहे.

दरम्यान, सर्व्हेअर खरात हे महापालिकेत जबाबदारीच्या पदावर कार्यरत असताना त्यांनी गैरवर्तन केले असून, महापालिकेची जनमानसातील प्रतिमा मलीन केलेली आहे. त्यामुळे खरात यांना अटक केल्याच्या दिनांकापासून सेवा निलंबित करण्यात आले आहे. तसेच, त्यांची खातेनिहाय चौकशी देखील सुरु करण्याचे आदेश आयुक्‍त हर्डीकर यांनी दिलेले आहेत. तसेच, खरात यांच्या सेवा निलंबनाच्या काळात उपजिविका भत्ता देण्यात येणार आहे.

परवानगीशिवाय बाहेर नाही…
सेवा निलंबन काळात खरात यांना अन्य कोणत्याही ठिकाणी नोकरी व व्यवसाय करता येणार नाही. दरमहा उदरनिर्वाह भत्ता मिळणेकामी त्यांनी अन्य कोणत्याही ठिकाणी सेवा, नोकरी व व्यवसाय केला नाही, असा दाखला दरमहा 20 तारखेच्या आत महापालिकेत दिल्यानंतरच उदरनिर्वाह भत्ता दिला जाणार आहे. त्या शिवाय निलंबन काळात त्यांचे मुख्यालय पिंपरी राहणार आहे. तसेच, त्यांना वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नाही, असेही महापालिका आयुक्‍त हर्डीकर यांनी आदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)