बनावट मतदार व पॅनकार्ड बनवणारे तिघे अटकेत

पुणे, दि. 12 (प्रतिनिधी) – हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरीकांच्या नावे बनावट निवडणूक मतदार ओळखपत्र तयार करून पॅनकार्ड बनवण्यासाठी पुरावा देणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. शुक्रवारी (दि. 11) संध्यकाळी साडेसात वाजता धनकवडी येथील तीन हत्ती चौकात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून 10 बनावट ओळखपत्र व पॅनकार्ड, दुचाकी, लॅपटॉप, तीन मोबाईल, मतदार नोंदणी अधिकाऱ्याचा शिक्का, हडपसर मतदारसंघाचे 3 शिक्के असा एकूण 1 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविंद्र हरीभाऊ जगताप (वय 36, रा. केशवनगर, धनकवडी), सुनिल मुरलीधर बारवकर (वय 31, रा. नवनाथनगर, धनकवडी) आणि गणेश जगन्नाथ शिळीमकर (वय 34, रा. विजयानगर सोसायटी, वडगांव धायरी) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

बारवकर हा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात मतदान कार्डाची माहिती संगणकामध्ये भरण्याचे काम करायचा. त्याच्या लॅपटॉपमधील मतदारांची माहीती तो शिळीमकरला देत होता. तर शिळीमकर हा मिळालेल्या माहितीमधील अद्याक्षरे किंवा क्रमांकामध्ये फेरफार करून त्यावर स्कॅन केलेला फोटो टाकून त्याची प्रिंट काढायचा. त्यानंतर या प्रिंटवर जगताप चोरलेले अधिकाऱ्यांचा व मतदारसंघाचे शिक्के मारून आणि जून्या मतदानकार्डाचे हॉलोग्राम चिकटवून लॅमिनेशन करत होता. शिळीमकर हा अन्य दोघा आरोपींना त्या कामासाठी वेळोवेळी रोख पैसे द्यायचा. याबाबत पोलिस नाईक रमेश चौधर यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी माहितीची खातरजमा करून ही कारवाई कारवाई केली.

त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांच्याजवळून 10 बनावट ओळखपत्र व पॅनकार्ड, दुचाकी, लॅपटॉप, तीन मोबाईल, मतदार नोंदणी अधिकाऱ्याचा शिक्का, हडपसर मतदारसंघाचे 3 शिक्के असा एकूण 1 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलिस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, सहायक फौजदार राजेंद्रसिंग चौहान, रविंद्र कदम, हवालदार सुनिल चिखले, गणेश साळुंके, संजय बरकडे, अजय उत्तेकर, शिपाई कैलास साळुंके, रमेश चौधर, राकेश खुणवे, प्रविण पडवळ, विवेक जाधव आणि गंगावणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)