बनावट बक्षीसपत्राद्वारे चुलत्याची जमीन लाटली

वडकी येथील जमीनीचे प्रकरण ः तिघांविरोधात गुन्हा दाखल

लोणी काळभोर-चुलत्याने पुतण्यास विश्वासाने जागेची कागदपत्रे दिली असता त्याने त्याचा साथीदार मित्राशी संगनमत करून, परस्पर कागदपत्रात फेरबदल केला. चुलत्याच्या जागी दुसरी व्यक्‍ती उभी करून स्वतःच्या नावे बनावट बक्षीसपत्र तयार करून ही जमीन त्याच्या नावे करून घेत फसवणूक केली.
याप्रकरणी वसंत शिवराम निंबरे (वय 64, रा. ताडीवाला रोड, कुमार गरीमा सोसायटी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात राजेश शामराव निंबरे (रा. येरवडा, पुणे), भुपेंद्र अनिल जगताप व भरत बबन मोडक (दोघे रा. वडकी, ता. हवेली) या तिघांविरोधांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत निंबरे हे कुमार गरीमा सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे तीन भाऊ मयत झाले आहेत. त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा राजेश हा आपल्या आईसमवेत येरवडा येथे राहतो. वसंत निंबरे यांनी लग्न केले नसल्याने त्यांना कोणीही वारसदार नाही. ते काम करून पुतण्यास मदत करतात. सन 1984 साली त्यांनी वडकी गावच्या हद्दीत गट क्रमांक 1236 मध्ये 5 आर क्षेत्र बबन हरिबा मोडक यांचेकडून खरेदीखताने विकत घेतले आहे. तेव्हापासून या क्षेत्रावर त्यांचा ताबा आहे. सन 2017मध्ये त्यांना काम होत नसल्याने हे क्षेत्र विकण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता.
सन 2017मध्ये वसंत निंबरे यांनी पुतण्या राजेश यांस या जमिनीसाठी ग्राहक पाहण्यासाठी सांगितले व कागदपत्रे त्याच्याकडे दिली. तोपर्यंत या जागेचा सातबारा त्यांच्याच नावावर होता. मागील वर्षी 2018मध्ये त्यांना जमिनीसाठी ग्राहक मिळाले. त्यासाठी त्यांनी सातबारा काढला असता तो पुतण्या राजेश याचे नावावर निघाला. याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यांना हाकलून दिले. त्यानंतर त्यांनी या क्षेत्राची कागदपत्रे काढली असता त्यांना बक्षीसपत्राद्वारे ही जागा राजेश याच्या नावावर त्याचा मित्र भूपेंद्र जगताप याच्या मदतीने झाली असल्याची माहिती मिळाली. त्यांनी राजेश याला कधीही बक्षीसपत्र करून दिले नव्हते. तरीही बक्षीसपत्रात नमूद असलेली कागदपत्रे, खोटे पॅनकार्ड व स्वाक्षरी तसेच ते नसताना दुसऱ्या व्यक्तीला त्यांच्याजागी उभे करून खोटे बक्षीसपत्र तयार करून त्यांची फसवणूक केली. जमीन स्वतःच्या नावावर करून ही जमीन इतर व्यक्तींना विकत असल्याचे त्यांना समजले.
दोन महिन्यांनंतर वसंत निंबरे हे पुन्हा आपल्या जमिनीवर गेले असता त्यांना भरत बबन मोडक याने तेथे येऊ दिले नाही. येथे तुझी जागा नाही, परत यायचे नाही. अशी दमदाटी करून तेथून हाकलून दिले. म्हणून त्यांनी तिघांविरोधांत फसवणुक केली म्हणून तक्रार दिली आहे. पुढील तपास ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)