बनावट पासप्रकरणी गुप्तहेरांची पथके

एसटी महामंडळातर्फे चौकशी : रॅकेटवर लक्ष

पुणे – अवघ्या शंभर रुपयांत एसटीचा बनावट पास देणाऱ्या रॅकेटची एसटी महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी महामंडळाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या तपासासाठी खास पथकांची स्थापना केली आहे. त्याशिवाय महामंडळातील साध्या वेषातील खास गुप्तहेरही या रॅकेटवर लक्ष ठेऊन असणार आहेत.

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदार आणि अन्य प्रवर्गासाठी सवलतीच्या दरात पास योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरात दररोज किमान साडेचार ते पाच लाख नागरिक आणि विद्यार्थी प्रवास करत असतात; त्याशिवाय विद्यार्थीनींना मोफत पासचे वितरण करण्यात आले आहे. हे सर्व प्रकारचे पासेस हे अजूनही कागदी स्वरुपात असून त्यांचे संगणकीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे हाच फायदा घेऊन हे पास बनावट तयार करणे सहज शक्‍य बाब आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन एका रॅकेटने बनावट पास तयार केले आहेत. या रॅकेटचे मुख्य केंद्रबिंदू हे पुणे असून बनावट पासची छपाईसुद्धा पुण्यातील एका खाजगी छापखान्यात होत असल्याची बाब उघडकीस आली होती. यासंदर्भात दैनिक “प्रभात’ ने 8 नोव्हेंबरच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महामंडळाच्या वरिष्ठांमध्ये खळबळ उडाली होती.

या बनावट पासची टोळी राज्यभरात सक्रीय आहे. या टोळीला पुण्यातील रॅकेटकडून या पासेसचा पुरवठा होत असून त्यासाठी खास व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. या बनावट पासचे वितरण आणि वापर होत असताना लातूर पोलीसांनी तिघांना लातूरच्या बसस्थानकावर अटक केली होती. त्यावेळी या आरोपींनी यासंदर्भात कबुली देताना या रॅकेटचे केंद्रबिंदू पुण्यात असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार महामंडळाच्या सर्व आगार प्रमुखांना यासंदर्भात दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, तरीही या टोळक्‍याचा उपद्रव कमी झाला नसल्याचे निदर्शनास आले होते.

त्यामुळे या प्रकाराची तीव्रता लक्षात घेऊन महामंडळाच्या वतीने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठी राज्यभर पथके नेमण्याचे आदेश सर्व आगार प्रमुखांना देण्यात आले आहेत. महामंडळाने तयार केलेले पास आणि बनावट पास कसे ओळखावेत यासंदर्भात सर्व वाहकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे या टोळीचा लवकरच पर्दाफाश करणे या पथकांना शक्‍य होणार आहे, असा दावा महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी “प्रभात’ शी बोलताना केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)