बनावट धनादेशाद्वारे फसवणूकप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

पुणे – ज्येष्ठ महिलेच्या खात्यात अनोळखी व्यक्तीने 12 लाख 74 हजार 135 रुपये भरले. ते पैसे आणि त्या महिलेच्या खात्यातील 7 लाख 74 हजार रुपये बनावट धनादेशाद्वारे काढून फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तर आणखी चौघांविरोधात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीता विकास शेवडे (वय 56, रा. पौड रस्ता) आणि मनोज विलास कुरकुरे (वय 35, रा.वानवडी) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. तर शुभांगी खेडगीकर, नवनाथ जावळे, सिमा काळे आणि राजाराम गायकवाड या चौघांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौघांचा शोध घेत आहेत. ही घटना 29 ऑगस्ट 2016 ते 5 एप्रिल 2017 या कालावधीत घडली. याबाबत अरणेश्‍वर भागात राहणाऱ्या 73 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादींचे सहकारनगर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र येथे खाते आहे. त्यांच्या खात्यावर अनोळखी व्यक्तीने 12 लाख 74 हजार 135 रुपये भरले. ते आणि त्यांच्या खात्यातील 7 लाख 74 हजार रुपये 15 धनादेशांचा वापर करून काढण्यात आले. फिर्यादींनी धनादेश घेतले नसताना बनावट धनादेशाचा वापर करून ही रक्कम काढण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नीता शेवडे हिला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आणि कुरकुरे याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी दोघेही पोलिसांना तपासास सहकार्य करत नाहीत. सीसीटीव्हीमध्ये दोन्ही आरोपी बॅंक व्यवस्थापकाशी कॅबिनमध्ये चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत तपास करण्यासाठी तसेच फरार साथीदारांच्या शोधासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकिलांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)