बनावट दारूची “होम डिलिव्हरी’ ; उच्चभ्रू ग्राहकांची फसवणूक

स्कॉचच्या बाटलीत व्हिस्की : उच्चभ्रू ग्राहकांची राजरोस फसवणूक
एकाला अटक : साडेअकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त
– महाविद्यालयीन तरुण, आयटी कर्मचारी होते “टार्गेट’

प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि.19- महाविद्यालयीन तरुण, आयटी क्षेत्रातील कर्मचारी यांना बनावट मद्याची विक्री करणाऱ्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने जेरबंद केले आहे. या ग्राहकांना आरोपी मागील पाच ते सहा महिन्यांपासून मद्याची होम डिलिव्हरी करत होता. उंची ब्रॅंडच्या स्कॉचच्या बाटलीत व्हिस्कीची भेसळ करुन विकली जात होती. व्हिस्की व स्कॉचच्या दरात जवळपास दुप्पट फरक आहे. व्हिस्की 180 रुपयांपासून तर स्कॉच 500 ते 1000 रुपयांपासून उपलब्ध असते.

नागा डाया चावडा (35, रा. पिंपळेगुरव) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून विविध ब्रॅंडच्या उच्च प्रतीच्या मद्याच्या एक लिटर क्षमतेच्या 67 बाटल्या तसेच 500 रिकाम्या बाटल्या, 2 हजार बुचे, 260 लेबल, 950 कव्हर असा 11 लाख 39 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अवैध व बनावट दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वॉच ठेवला आहे. बनावट स्कॉचची विक्री होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार स्कॉचच्या दोन बाटल्या दुचाकीवरुन घेऊन जाताना आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे बाटल्या ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली. तेव्हा उच्च प्रतिच्या स्कॉचमध्ये कमी प्रतिचे मद्य भरल्याचे आढळून आले. त्यानुसार त्याच्या घराची झडती घेतली असता, बनावट मद्यासाठी लागणाऱ्या रिकाम्या बाटल्या, बुचे, लेबल आढळून आले.
ही कारवाई निरीक्षक अे.बी.पवार, उप निरीक्षक एस.आर.दाबेराव, सचिन भंबड, तसेच दत्ता गवारी, स्वप्नील दरेकर, महेंद्र कदम, प्रिया चंदनशिवे, शशांक झिंगळे यांच्या पथकाने केली.

यापूर्वी पकडले होते साथीदारास
यातील आरोपी चावडाच्या साथीदारास उत्पादन शुल्क विभागाने बनावट मद्य विकताना काही दिवसांपूर्वी पकडले होते. यानंतर या दोघांवरही वॉच ठेवण्यात आला होता. चावडा हा बनावट मद्य विकत असल्याचे लक्षात येताच सापळा रचून त्याला पकडण्यात आले. तो शहरातील नामांकित महाविद्यालयांच्या वसतिगृह तसेच आयटी कंपन्यांचे कर्मचारी राहत असलेल्या सोसायट्यांमध्ये जाऊन उंची स्कॉचची होम डिलिव्हरी करत होता. मात्र स्कॉचच्या बाटलीत तो घरी व्हिस्कीची भेसळ करत होता. यातून तो 50 टक्के फायदा मिळवत असल्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)