बनावट किसान विकासपत्रांद्वारे बॅंकेची फसवणूक

64 लाखांचा गंडा, चार भामटे जेरबंद, मोठ्या रॅकेटची शक्‍यता

पुणे – बनावट किसान विकासपत्रे गहाण ठेऊन इंडियन बॅंकेला तब्बल 64 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, सामाजिक सुरक्षा विभागाने या प्रकरणाचा पर्दाफाश करुन चार भामट्यांना सापळा रचून गजाआड केले आहे. विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. यामध्ये मोठे रॅकॅट असण्याची शक्‍यता असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याचे संकेत मिळत आहेत.
हेमंत चतुर्भुज क्षीरसागर ( वय, 38, रा. चाळ नं. 9. रुम नं. 10, संभाजीनगर, धनकवडी, मूळ गाव, वाळुक देवगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर), अनुराधा भगवानदास वर्मा ( वय, 40, सी. 604, सव्हाना, बायफ रोड, वाघोली), सतीश चंद्रन नायर ( वय, 50, रा. सी/2/18, मधुराज नगर, पौड रोड) आणि स्नेहराज शरद मोरे (वय, 34, रा. फ्लॅट नं. 103, चिन्मय क्‍लासिक सोसायटी, साईनगर कोंढवा) या भामट्यांना पोलीसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षीरसागर हा या रॅकेटचा म्होरक्‍या आहे. त्याने वर्मा, नायर आणि मोरे यांच्या साथीने बनावट किसान विकासपत्रे तयार केली. ही विकासपत्रे त्यांनी इंडियन बॅंकेच्या शिवाजीनगर आणि खडकी येथील शाखेत गहाण ठेवली, याद्वारे या भामट्यांनी बॅंकेकडून तब्बल 64 लाखांचे कर्ज घेतले. कर्जे दिल्यानंतर बॅंकेच्या वरिष्ठ कार्यालयाच्या मार्फत कागदपत्रांची पडताळणी सुरु होती, त्यावेळी ही किसान विकासपत्रे बनावट असल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली, पाटील यांनी खातरजमा केली असता ही किसान विकासपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

क्षीरसागर आणि त्याचे साथीदार काही कामानिमित्त इंडियन बॅंकेच्या शिवाजीनगर शाखेत येणार असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती, त्यानुसार पाटील आणि त्यांच्या पथकाने इंडियन बॅंकेच्या शिवाजीनगर शाखेत सापळा रचला होता. क्षिरसागर आणि त्याचे साथीदार बॅंकेत आल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने त्यांना गजाआड केले. अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले, संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, प्रमोद म्हेत्रे, संजय गिरमे, नितीन तेलंगे, ननिता येळे आणि सचिन शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)