बनावट कागदपत्रांद्वारे मिळवले क्रेडिट कार्ड

पाच बॅंकांची फसवणूक : खऱ्या कागदपत्रांत फेरफार
पुणे (प्रतिनिधी)- आयटी इंजिनिअरच्या कागदपत्रात फेरफार करुन विविध पाच बॅंकांमधून क्रेडिट कार्ड काढणाऱ्या उच्चशिक्षीत तरुणास पुणे पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून मोबाइल, चार डेबिट कार्ड, एक पॅनकार्ड आणि एक वाहन परवाना जप्त करण्यात आला आहे.
स्मिथ ईम्यॅन्युअल साळवे (29, रा. पिंपळे गुरव) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ब्रिजेस नंदन यांनी फिर्याद दिली आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की, पिंपळे गुरव येथे रहाणार ब्रिजेश हे व्होडाफोन कंपनीमध्ये आयटी इंजिनिअर आहेत. त्यांना एका बॅंकेच्या ऑफिशीयल ई-मेलवरुन एक मेल आला होता. यामध्ये तुमच्या क्रेडिट कार्डची प्रोसेस पूर्ण झाली आहे. कागदपत्रांच्या व्हेरिफिकेशनसाठी आधारकार्ड, पे स्लीप किंवा वाहन चालविण्याचा परवाना द्यावा लागणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारच्या क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला नसल्याने, ई मेलकडे दुर्लक्ष केले. यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्यांना मेल आला की, तुमची कागदपत्रे इंडसइंड बॅंकेच्या कर्मचाऱ्याने तुमच्याकडून प्राप्त करुन घेतली आहेत. कागदपत्रे दिली असल्याचे कन्फर्मेशन द्या. यावर ब्रिजेश यांनी कागदपत्रे दिली नसल्याबाबत इ-मेल करुन रिक्वेस्ट कॅन्सल करण्यास सांगितली. यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या व त्यांनर तिसऱ्या व एका चौथ्या बॅंकेकडून असेच ई-मेल आले. यामुळे ते चौकशीसाठी एका बॅंकेत गेले असता, त्यांना कळाले की त्यांच्या नावाने क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज आला आहे. त्यामध्ये ब्रिजेश यांच्या वैयक्तीक कागदपत्रांमध्ये फेरफार करुन दुसऱ्या व्यक्तीचे छायाचित्र लावलेले आढळले. इतर दोन बॅंकांनीही त्यांना क्रेडिट कार्डसाठी कागदपत्रे मिळाल्याचे सांगितले. आपल्या नावाचा व कागदपत्रांचा वापर करुन कोणीतरी फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेथे गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर सेल समांतर तपास करत होती.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त (आर्थिक व सायबर) सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त संजय कुरुंदकर, पोलीस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनाली फटांगरे, कर्मचारी संतोष जाधव, अजित कुऱ्हाडे, दीपक भोसले, राजकुमार जाबा, तोसीफ मुल्ला, दिपक माने, नितोश शेलार, शाहरुख शेख यांनी केली.
असा समोर आला बनाव
एका बॅंकेच्या क्रेडिट कार्डसाठी स्मिथ साळवेने दुय्यम संपर्क क्रमांक दिला होता. ते सिमकार्ड आरोपी साळवेच्या नावावर होते. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने बी.एसस्सी. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असल्याचे व शेअर मार्केट ट्रेडिंग करत असल्याचे सांगितले. आर्थिक अडचणींमुळे त्यांने ब्रिजेशच्या नावाने आलेले पार्सल प्राप्त करुन त्यातील कागदपत्रांवर सायबर कॅफेमध्ये जावून फेरफार केला. यानंतर विविध बॅंकांना क्रेडिट कार्डसाठी अर्ज केले होते. बॅंकांकडे सादर केलेल्या कागदपत्रांवरील फोटो साळवीचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याला अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)