बनावट कागदपत्रांच्या आधारे जागेची खरेदी : बिल्डरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे- बनावट कागदपत्रांच्या आधारे 2 हेक्‍टर 66 आर जमीन खरेदी करून फसवणूक केल्याप्रकरणात निगडी येथील बिल्डरचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला आहे.
दिगंबर ज्ञानदेव पाटील असे त्या बिल्डरचे नाव आहे. या प्रकरणात फारोख माणेक घडीयाली (रा. कॅम्प) याला अटक केली असून, त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात ऍड. बी. ए. जमादार, ऍड. सुधीर मधुकर निरफराके (वय 59, रा. घोरपडी पेठ) आणि एम. डी. शेख (रा. सोलापूर) या तिघांवर गुन्हा दाखल आहे. तिघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याबाबत बेहजाद मर्झबान इराणी (रा. इराणी रस्ता, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 25 एप्रिल 2010 ते 9 नोव्हेंबर 2015 या कालावधीत घडली. फिर्यादी यांचे वडील मर्झबान यांच्या नावावर बिबवेवाडी येथे 2 हेक्‍टर 66 आर जमीन होती. मर्झबान यांच्या खोट्या सह्या घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे आराध्या बिल्डरचे पाटील याने 12 कोटी 56 लाख 75 हजार 500 रुपयांना ही जागा विकत घेतली. या प्रकरणात पाटील याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास सहायक जिल्हा सरकारी वकील सुरेश गवळी यांनी विरोध केला. पाटील याने या गुन्ह्यातील आरोपी फारोख याच्या मदतीने बनावट सात-बारा उतारा तयार केला आहे. तो कोठे बनविला, त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, तपासणीमध्ये मयत मर्झबान यांची सही बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे पाहाता पाटील याला अटक करून त्याच्याकडे तपास करणे आवश्‍यक आहे. यासाठी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. गवळी यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)