बनावट कर्ज प्रकरणाद्वारे तीन कोटी 10 लाख 89 हजार रूपयांचा अपहार

पुणे,दि.4- लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी बनावट कर्ज प्रकरणाद्वारे तीन कोटी 10 लाख 89 हजार रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोने तारण ठेऊन कर्ज देण्यात आल्याचे भासविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात सोने तारण ठेवण्यात आले नसल्याची बाब दुय्यम निबंधक कार्यालयाने केलेल्या लेखापरिक्षणात आढळून आली आहे.
याप्रकरणी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप पावसकर (रा. तन्वी रेसीडन्सी, औंध गाव), उपाध्यक्ष पंढरीनाथ राऊत (रा. आकांक्षा रेसीडन्सी, औंध गाव), मानद सचिव नितीन खोंड (रा. खोंड आर्केड, परिहार चौक, औंध चौक) यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुय्यम निबंधक कार्यालयातील लेखापरीक्षक दिपाली पारधी यांनी यासंदर्भात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांकडून ठेवी स्विकारण्यात आल्या होत्या. ठेवी गोळा केल्यानंतर त्यांना व्याज देण्यात आले नाही तसेच ज्यांनी मुदत ठेव ठेवली होती, त्यांची मुदत संपल्यानंतर ठेवी परत करण्यात आल्या नव्हत्या. पावसकर, राऊत, खोंड यांनी संगनमत करून बनावट कर्ज प्रकरण सादर केले. सोने तारण ठेवून कर्ज दिल्याचे भासविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, सोने तारण ठेवण्यात आले नव्हते. मागील दोन वर्षांत पावसकर, राऊत, खोंड आणि पदाधिकाऱ्यांनी तीन कोटी 10 लाख 89 रूपयांचा अपहार केला होता.
याबाबत दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यात आले. तेव्हा पावसकर, राऊत, खोंड यांनी गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. लेखापरीक्षक पारधी यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)