बदलांच्या उंबरठ्याशी… (भाग-१)

न्या. लोढा समितीने क्रिकेट नियामक मंडळाच्या नव्या घटनेसाठी ज्या शिफारशी केल्या होत्या, त्यातील अनेक शिफारशींना क्रिकेट मंडळ आणि राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतले होते. यातील अनेक आक्षेप
सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले असून, आता नवी घटना अस्तित्वात येण्याच्या उंबरठ्याशी आहे. ती पूर्णतः स्वीकारली न गेल्याने न्या. लोढा काहीसे नाराज असले, तरी क्रिकेट मंडळाच्या संचालनात मोठे फेरबदल होणार आहेत आणि त्यामुळे कामकाजात बदलाची अपेक्षा करता येते, हे निश्चित.

नव्या घटनेतील दोन कलमे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. एक म्हणजे, कूलिंग ऑफ पीरिअड आणि दुसरे म्हणजे, 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना पदाधिकारी बनण्यास मनाई. वस्तुतः या दोन महत्त्वपूर्ण तरतुदींमुळे बरेच आजी-माजी पदाधिकारी निवडणूक लढविण्यासच अपात्र ठरले आहेत. प्रत्येकी तीन वर्षांचे दोन कार्यकाळ पदाधिकारी राहिल्यानंतर एक कार्यकाळ संबंधित पदाधिकाऱ्याला विश्रांती देण्याची (कूलिंग ऑफ पीरिअड) तरतूदही महत्त्वाची आहे. या तरतुदीमुळे बीसीसीआयचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना, सचिव अमिताभ चौधरी, माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर, आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ली आणि ब्रजेश पटेल हे सर्वजण निवडणूक लढविण्यास अपात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे 70 वर्षे वयानंतर पदावर न राहण्याच्या अटीमुळे शरद पवार, निरंजन शाह, एन. श्रीनिवासन आणि जी. गंगाराजू हेही निवडणुकीच्या आखाड्याबाहेर फेकले गेले आहेत.

बदलांच्या उंबरठ्याशी… (भाग-२)

-Ads-

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोहरी यांना नवी घटना तीस दिवसांच्या आत रजिस्ट्रार ऑफ सोसायटीज यांच्याकडे सोपवावी लागणार आहे आणि त्याचा अहवाल महासचिवांना सादर करावा लागणार आहे. राज्य क्रिकेट संघटनांनाही अशाच प्रकारे नव्या घटनांची नोंदणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर तीस दिवसांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतील. बंगाल क्रिकेट संघटनेचे (सीएबी) अध्यक्ष सौरव गांगुली यांचे नाव बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. एक प्रशासक या नात्याने ते सीएबीशी चार वर्षांपासून जोडले गेले आहेत आणि गेल्या तीन वर्षांपासून अध्यक्ष आहेत. परंतु बीसीसीआयचे अध्यक्ष व्हायचे असेल तर त्यांना आधी सीएबीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर जर त्यांची निवड बीसीसीआयच्या अध्यक्षपदी झाली, तर त्या पदावर ते केवळ दोनच वर्षे राहू शकतील.

– अॅॅड. अतुल रेंदाळे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)