पिंपरी – भारतीयांची जीवनशैली एकेकाळी आदर्श मानली जात होती. मात्र बदललेल्या जीवनशैलीमुळे व सकाळी पोटभर जेवण करण्याऐवजी चहा घेण्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जात आहे. डॉक्टरकडे जाण्याचा खडतर मार्ग आपणच तयार करत आहोत असे प्रतिपादन डॉ. संतोष सुर्यवंशी यांनी येथे केले.
चिंचवड गावातील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यान मालेचे उद्घाटन गुरुवारी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘मनुष्य स्वभाव आणि त्याची जीवनशैली’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना डॉ. सुर्यवंशी बोलत होते. यावेळी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, आतंरराष्ट्रीय धनुर्विद्यापट सोनाली बुंदेल. अविनाश तिकोने, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सचिन गजानन चिंचवडे, सुहास पोफळे आदी उपस्थित होते.
डॉ. सुर्यवंशी म्हणाले की, मनुष्यजातीचा इतिहास मोठा आहे. मानव मंगळापर्यत पोचला. अजून एक पृथ्वी तो शोधतो आहे. माकडातून माणुस झाला या माणसाला समाधानी, आनंदी राहायला आवडते. मात्र या व्यतिरिक्त त्याच्याकडे आलेला अतिउत्साह आणि चिडचिडपणा भावनिकता हे मानवी स्वभावाचे कंगोरे कुठून आले याचा विचार करण्यासाठी स्वत:कडे जावे लागते. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात.
आपली बदललेली जीवनशैली रोगांना निमंत्रण देत असल्याचे सांगून डॉ. सुर्यवंशी म्हणाले की, ज्या घरात माती, गाय आहे ते सुखी घर मानले जायचे. विहीरीत तोंड बुडवून पाणी पिण्यात, सकाळी शेतावर जाण्यासाठी दही, ठेचा, भाकरी खाण्यात आनंद आणि आरोग्यही लपलेले होते. मात्र इंग्रज बन लॉर्ड मेकॉले आम्हाला चहाचे विष देऊन गेला. सकाळी आपल्याला भूक लागते. पोट मला जेवण हवे आहे. असे सांगत असते. पण आपण चहा घेतो. भूक लागल्यावर जेवण न करता चहा घेल्याने पित्त खवळते. चिडचिडेपणे, एकाजागी स्थिर न वाटणे, मधुमेह, ॲसिडीटी, ऊन सहन न होणे, लिव्हर स्वादुपिंडाचे आजार अंगदुखी, या आजारांना निमंत्रण दिले जाते. असे डॉ. सुर्यवंशी म्हणाले.
भूक मेल्यावर आपण दुपारी तेही चवीचे काही खावे किंवा टाईम पाससाठी जेवण करतो. विझलेल्या चुलीवर अन्न कसे शिजेल याचा विचार आपण करत नाही. हे अन्न अंगावर साठून जडपणा, वजन वाढणे, पोट फुगणे, कोलेस्टॉल वाढणे, कॅन्सर या आजारांकडे शरिर वळते. इतर देशातले लोक हॉटेलात अधिक जेवण करतात. भारतात आई, बहीण, वहिणी असे स्वयंपाक घरातले तज्ञ आपल्याकडे असताना आपण शरिराची आबाळ करतो त्यामुळे खाली खाली कुंथावे लागणे, मुळव्याध यासारके आजार तर वरच्या पोटात भूक अशी स्थिती होते. आपण दिवसभर कष्ट करतो, गृहिणी कष्ट करतात पण पोटाला जेवायला घालायला आम्हाला वेळ नाही अशी खंत डॉ. सुर्यवंशी यांनी व्यक्त केली. जेवणाआधी पाणी पिण्याने अग्निमांध होणे त्यामुळे जेवताना प्रत्येक घासाला जिभ ओली होईल एवढे पाणी प्यावे असा सल्ला त्यांनी दिला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा