बदललेले पुणे…

चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट थिंग इन द वर्ल्ड असं म्हणतात. पुणं म्हणजे भारताची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी. पेशव्यांचं पुणं, पुणेरी बाणा, खवैय्या पुणेकर, पुणेरी पगडी, पुणेरी शालजोडीतले, पुण्याचे खास चौक-12! एकूण काय- पुण्याचा लौकिक पूर्वीही होताच आणि आत्ताही आहे.

भारताच्याच नव्हे, तर जगाच्या नकाशावर आपली वैशिष्टं जपणारं आपलं पुणं. माझ्या 40 वर्षाच्या आठवणीतलं पुणं मात्र खरंच खूप बदललंय. इतकं की आठवावं लागतंय पूर्वी कसं होतं ते. माझ्या जन्मापासून मी मुंबईतच मोठी झाले. पण पुण्यात मामा-आजीचे घर असल्याने दर मे महिन्याची सुट्टी पुण्यालाच असायची. अगदी “मामाच्या गावाला जाऊ या…’ या गाण्यासारखी; वर्षभर वाट पहायची अशीच. आजीचे घर सदाशिव पेठेत- ट्रेनिंग कॉलेज स्टाफ क्वार्टर- टिळक रोड! अगदी जवळचा अलका चौक किती मोठ्ठा वाटायचा तेव्हा. मे महिन्याची पुण्यातली सुट्टी म्हणजे धमाल. थंड हवा, उन्हाळ्यामुळे गच्ची किंवा अंगणात झोपायची मज्जाच वेगळी. सकाळी लवकर उठून पर्वती किंवा सारसबाग फेरीला घरातली बच्चे कंपनी. मग आज्जीने दिलेला गरमगरम नाश्‍ता. कधी पोहे कधी सांजा, तर कधी फोडणीची पोळी. रविवारची खासियत म्हणजे काकाने आणलेले ग्रीन बेकरीचे खारी पॅटिस. असा पदार्थ कुठे खाल्लाच नव्हता. आता कदाचित मिळत असेल इतरत्र, पण मुळात तो पुणेरी पदार्थच असावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लहानपणी “पुणं’ म्हटलं की, खाऊचीही चंगळ! विशेष म्हणजे चितळे बाकरवडी, नाज बेकरीचे सामोसे, सारसबागेजवळची भेळ, आणि जयश्री किंवा सुजाताची मस्तानी. त्यावेळी आजसारखी गल्लोगल्ली हॉटेल्स नसत आणि आजसारखा मुबलक पैसाही नव्हता हातात खेळत. त्यामुळे असेल कदाचित- बाहेरचे खाणे ठरवून, क्वचित – काही विशेष असेल तरच. पण ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते.

पुण्यात आम्हा मुंबईकरांना गंमत वाटायची ती इथल्या रिक्षांची. त्यांचे ते भोपू हॉर्न्स-पॉंव-पॉंव असे वाजणारे. फार गम्मत वाटायची. तेव्हा टिळक रोड इतका मोठ्ठा वाटायचा. रस्त्यात रहदारी नसायची- सायकल असत. बसेस, रिक्षा- कार्स तर फारच थोड्या- दोनच प्रकारच्या- फियाट (प्रीमिअर पद्मिनी) आणि अम्बॅसॅडर. हॉर्न ऐकून “कार कुठली ओळखा’, असे खेळ. महाराष्ट्र मंडळच्या उन्हाळी शिबिराला जाण्याची पण गम्मत. एखाद्याच्या वाढदिवशी पार्टी म्हणून विजय, मंगला किंवा अलका टॉकीजला बघितलेला सिनेमा, आणि “टीस्मा’मध्ये एखाद बालनाट्य. पुण्यात फक्त मराठी भाषा ऐकायची. हिंदी तर इतकी विनोदी; आणि पुणेरी परखडपणा, टोमणे, शुद्ध “पेठी’ मराठीतले अलंकारयुक्त अनुनासिक मराठी संवाद.

कालाय तस्मै नमः: काळ बदलला. वय बदललं. आयुष्य बदललं. नाती बदलली. संदर्भ बदलले. रोल बदलले. लग्न पुणेरी मुलाशी झाल्यामुळे मीही “पुणेकर’ झाले! जग बदललं तस पुणंही बदललं. मुळातच स्वतः:ची अस्मिता अत्यंत स्ट्रॉंग असल्याने असेल कदाचित… पुणं फार जास्तच बदललं. एकेकाळचं पेन्शनरांचं पुणं, शांत पुणं, संस्कृती आणि वारसा जपणारं पुणं… पारंपरिक- काहीसं मोजून-मापून वागणारं पुणं आता ग्लोबल होऊ लागलं. शैक्षणिक संस्थांनी गजबजलं. शिक्षण नोकरीच्या निमित्ताने इथे आलेल्या मंडळींना इथलं हवापाणी साधेपणा, सुसंस्कृतपणा भावला आणि अशा सगळ्या पाहुणे मंडळींनी इथेच बस्तान ठोकलं. देश-विदेशच्या खाद्य संस्कृतीचं इथे आक्रमण झालं. मग दर एक आड एक दुकान रेस्टारंट झालं… तरीसुद्धा वैशालीचा डोसा, जोशीचा वडापाव, गुडलकचं बन ऑम्लेट, मथुराचं थालीपीठ आपापली लोकप्रियता टिकवून आहेत. पुण्याची भाषा बरीच बदलली. मुळात अनुनासिक स्पष्ट उच्चारकर्त्यांची संख्याच आता खूप कमी झाली आहे! पुण्यात “मिंग्लिश’, “मिंदी’ भाषा जास्त प्रचलित झाल्या! व्याकरणाचा बोलीभाषेचा संबंध संपलाय.

पुण्यात घरेदारे बदलली. वाडे गेले. वाडे संस्कृतीही गेली. फ्लॅट झाले. बहुमजली बिल्डिंग आल्या. शॉपिंग कॉम्प्लेक्‍स आली. मॉल आणि मॉल संस्कृतीही आली. या सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानीतल्या नामवंत रस्त्यावर अगदी रात्रीबेरात्रीपर्यंत तोकड्या कपड्यातला सिगरेट ओढणाऱ्या मुली आणि डूल आणि फिरंगी कपडे घातलेली मुले- यांच्या टोळक्‍यांनी गल्लीबोळ व्यापून टाकले.

पुण्यानं टाकलेली कात, जगाच्या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवायला सज्ज असलेली सांस्कृतिक आणि शैक्षणिक समाजव्यवस्थाही अपरिहार्यच असेल कदाचित… माझ्यासारख्या… किंवा माझ्यापेक्षाही ओरिजनल पुणेकर असलेल्यांना क्‍लेशकारकही असेल. कदाचित… पण स्वीकारावे तर लागणार- किंबहुना त्यानुसार आपणही बदलायला लागणार- तरच आपणही टिकू – त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आनंदाने जगू… शेवटी बदलाला विरोध करण्यापेक्षा आपण बदलणं आणि आपल्या सभोवताली आपल्याला हवे तसे बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असणं, हे जास्त गरजेचं आणि सकारात्मक आहे.

या निमित्ताने पुण्याच्या उन्हाळी सुट्टीतल्या सगळ्या गंमती जमती एखाद्या फ्लॅशबॅक सारख्या डोळ्यांपुढून गेल्या त्या डोळे पाणावूनच…

– डॉ. वैजयंती पटवर्धन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)