बदलते पुणे आजचे पुणे

कोणत्याही गोष्टीतील “बदल’ हा त्या गोष्टीची रुची वाढविणारा असतो. म्हणून तर बदल म्हणून रोज रोज घरचे रुचकर जेवण सोडून आज हॉटेलमध्ये (सुग्रास?) जेवायला जातो. कुठलाही बदल हा चांगला आणि सकारात्मक असेल तर जीवनाचीही गोडी वाढवितो. अनुभवाचे शहाणपण आले की भली-भली माणसेही बदलतात. तर एखाद्या शहराचे काय हो? ते तर नक्‍कीच बदलणार. अहो नुसते बदलणार नाही तर आमूलाग्र बदलणार! तसंच झालंय ना पुण्याचं? खरं सांगा.

वर्ष 2018 मध्ये पुण्याने राहण्यासाठी सर्वात उत्तम शहर म्हणून पहिला नंबर पटकावला आणि आम्हा पुणेकरांची आधीच ताठ असलेली मान आणखीनच ताठ झाली. अहो हेच तर वैशिष्ट्य आहे पुण्याचं! परंतु, साधारण 25-30 वर्षांपूर्वी सुद्धा पुणे हे फक्त शनिवार, नारायण, कसबा पेठ, सदाशिव पेठ, डेक्कन आणि सर्वात उंच समजली जाणारी पर्वती, इथपर्यंत मर्यादित होतं. खरे पुणेकर खरे तर याच भागातले. मोठमोठ्या वाड्यांमधून राहणारे, अडीअडचणीला एकमेकांना मदत करणारे, बोळामध्ये खांबाला स्टम्प करून क्रिकेटची मॅच खेळणारे, शनवारवाड्यावर किंवा संभाजी बागेत कधीतरी भेळ, पाणीपुरी किंवा संतोष किंवा वैशालीमध्ये इडली डोसा खाणारे हे खरे पुणेकर “कोथरूड’ या नव्याने विस्तारलेल्या भागात बंद दाराआड राहू लागले आणि पुणे बदलले. हळूहळू कोथरूडचा विस्तार झाला इकडे सातारा रोड, सिंहगड रोड, आणि स्टेशन परिसरातही मोठमोठ्या उंच इमारतींनी माणसं लांबलांब जाऊ लागली. आज पुण्याचा विस्तार इतका प्रचंड झाला आहे की इमारतींनी, वसाहतींनी सारे नगर व्यापून टाकले आहे. विस्तार होताना, मात्र लहान रस्ते, वाहनांची वाढती संख्या, अपुरी आणि मोडकळीस आलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था याचा कशाचाही विचार केलेला दिसत नाही. त्यामुळेच दिवसाच्या कोणत्याही वेळेस आणि अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा पुण्यातील सर्व रस्त्यांवर हल्ली कर्णकर्कश्‍य हॉर्न, वाहनांचे धावणे चालूच असते. रात्री 10 नंतर शांत होणारे पुणे आता निशाचर होऊ लागले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्येचे माहेर घर म्हणून प्रसिद्ध पुण्यात अनेक शिक्षण संस्थांनी मोठमोठी कॉलेजेस, शाळा, उघडल्या आहेत. परप्रांतातून अनेक विद्यार्थी पुण्यात शिकण्यासाठी येतात. या शिक्षण संस्थांच्या परिसरात आणि क्‍लासेसच्या आसपास तरुण-तरुणींचे घोळके, टू व्हीलरवरून सुसाट वेगाने जाणाऱ्या आणि चेहऱ्यावर बुरखा घातलेल्या मुली, धूम्रपान करीत असणारे तरूण ही नेहमीचीच दृष्ये झाली आहेत.

पुण्यामध्ये या विस्ताराने हॉटेल मालकांची मात्र चलती झाली आहे. बायका हल्ली घरी स्वयंपाक करत नाहीत की काय, असे वाटावे इतपत गर्दी हल्ली कुठल्याही हॉटेलमध्ये नेहमीच असते. अनेक वस्तू एकाच ठिकाणी मिळणारे अनेक मोठमोठे मॉल्स, सिनेमागृहे, यामध्येही नेहमीच गर्दी असते. आता गर्दी नाही असे ठिकाण शोधणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

पुलंच्या साहित्यावर प्रेम करणारे, सवाई गंधर्वसारख्या संगीत मैफिलीत आवर्जून हजेरी लावणारे, दुपारी 1 ते 4 झोप घेणारे, चितळ्यांशिवाय कुठलीही बाकरवडी न खाणारे आणि गाडगीळांशिवाय दागिने न करणारे, स्पष्ट व स्वच्छ शुद्ध मराठी थोडं तिरकसपणे बोलणारे, मिसळीवर ताव मारणारे, लग्नाच्या जेवणात जिलबी, मसालेभात आणि आळूची भाजी ओरपणारे, अस्सल पुणेकर आता लुप्त होत चाललेत. ते सगळे आता ज्येष्ठ नागरिक संघात जातात; अधूनमधून मुलांकडे परदेशात जातात. सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन कारल्याचा रस पितात आणि दोघेच म्हातारा-म्हातारी मोठ्या फ्लॅटमध्ये एकाकी राहतात. हे आहे बदललेल्या पुण्याचं चित्र! सगळेच बदल वाईट आहेत असे नाहीत. पण हे विस्तारलेपण काहीतरी गिळंकृत करतंय. स्मार्ट सिटीमधील स्मार्ट माणसे म्हणून वेगळेपण जपणारी पुणेरी माणसं हरवून जाऊन नयेत, एवढा प्रयत्न तरी नक्‍कीच व्हायला हवा.

– आरती मोने


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)