बदलते नातेसंबंध

जशा पिढ्या बदलल्या तसे वडिलांचे आणि मुलांचे नातेही बदलले. अगदी पूर्वीच्या काळात वडील आणि मुले एकमेकांशी एक शब्दही बोलत नसत. सगळे व्यवहार आईमार्फत होत. आईसुद्धा वडिलांचा मूड कसा आहे, हे बूघून मुलांचं सहलीला जाणं, शिकवणी लावणं, प्रगती पुस्तकावर सही करणं असे विषय काढत असे.

खरं तर वडिलांनासुद्धा मुलांचं खूप प्रेम असतं, पण बरेचदा ते व्यक्त करू शकत नाहीत किंवा नेमकं कसं व्यक्त करायचं हे त्यांना उमगत नाही. “गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली दिल्या घरी तु सुखी राहा’ यातून मुलगी सासरी जाण्याचं दुःख फक्त आईलाच आहे असं वाटत होतं तर “चालली शकुंतला लाडकी शकुंतला, तिच्यासवे चालतो तिच्यात जीव गुंतला’, यातून वडिलांच्या भावनाही सगळ्यांपर्यंत पोचल्या.

मुलांच्या नावापुढे फक्त वडिलांचं नाव लावलं जाणं हे तर वर्षानुवर्षे चालू आहे आणि पुढेही चालू राहणार, क्वचितच काही ठिकाणी आईचं नाव लावायची पद्धत नव्याने रुजतेय. पूर्वीची पुरुषप्रधान संस्कृती, कुटुंबात वडील एकटेच कमावणारे. कुटुंबात आई-वडिलांच्या भूमिका ठरलेल्या असायच्या. वडील ऑफिसमधून घरी आले की एकदम शांतता ठेवायची, मुलांनी चुपचाप अभ्यासाला बसायचं, कारण ते ऑफिसमधून दमून आलेले असल्यामुळे त्यांना त्रास नको, असं वातावरणही साहित्यातून वाचायला मिळतं.

अलीकडे वडील आणि मुले यांच्यात संवाद, सुसंवाद घडतो. कारण बहुतेक घरात एकुलतं एक मूल असतं. वडील आपल्या मुलांबरोबर बद्धिबळ, कॅरम खेळताना दिसतात. आई-वडील आणि मुलं मिळून सहलीला जातात तेव्हा वडील आणि मुलं अधिक जवळ येतात. मुलगा खूप शिकला की वडिलांना अभिमान वाटतो आणि हेच तो मुलगा उडाणटप्पू निघाला की स्वतःला दोष देतात, आपल्या वाढविण्यात, पालनपोषणात चूक झाली असं त्यांना वाटतं.

म्हातारपणी आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांविषयी पालकांच्या मनात राग, तिटकारा उत्पन्न होतो. मुलांना वाढविण्यासाठी त्रास घेतला, पण मुलांना जाणीव नाही याचं दुःख होतं.

कुटुंबात स्त्रिया कमावू लागल्या आणि वडिलांचा आर्थिक बोजा कमी झाला, तरीसुद्धा किती घरांवरील नेमप्लेटवर आईचं नावही घातलेलं असेल ते सांगता येत नाही. हल्लीच्या काळात वडिलांना एकट्याच्या कमाईवर कुटुंब चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. त्यामुळे त्यांना ताण नक्कीच येत असेल, शिवाय कुटुंबातील व्यक्तींच्या अपेक्षा पूर्ण करायच्या त्यासाठी करावी लागणारी धडपड, आपण पुरे पडू शकत नाही, कुटुंबातल्या व्यक्ती कितीही केलं तरी आनंदी राहात नाहीत यामुळे होणारं अपेक्षाभंगाचं दुःख, खरोखरच किती कुटुंबातल्या व्यक्तींना वडिलांची ही बाजू कळत असेल! आपल्याकडे सुरुवातीपासूनच साहित्य, मालिका यातून मातृऋणालाच अधिक महत्त्व दिलं जात होतं; परंतु समाजात अनेक पाश्‍चात्य कल्पना रुजू लागल्या. त्यात वेगवेगळे “डे’ साजरे करणं, त्या दिवशी त्या त्या व्यक्तींसाठी विशेष काहीतरी करणं हे आलं आणि “फादर्स डे’ साजरा होऊ लागला. आईच्या इतकाच वडिलांचा वाढदिवसही जोरात साजरा होऊ लागला. त्या दिवशी आवर्जून भेट देणं, बाहेर जेवायला किंवा पिकनिकला जाणं जे वडिलांच्या लक्षात राहील, त्यांना वाटेल असं केलं जात यातून नाती अधिकच जवळ येतात.

अलीकडच्या काळात घटस्फोट आणि पुनर्विवाहाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सावत्र वडील ही नवी भूमिकाही निर्माण झाली आहे. खरंच! या नात्यात दोन्हीकडून रुळेपर्यंत किती अवघडेपण येत असेल. कदाचित काहींमध्ये शेवटपर्यंत जवळीक होतच नसेल केवळ कर्तव्य पार पाडले जात असेल तर काही ठिकाणी ही नाती कल्पनेपेक्षा अधिक मिसळून जात असतील, त्या कुटुंबांमध्ये या गोष्टी अधिक सहजपणे घडत असतील. अगदी हीच गोष्ट पूर्णतः अनोळखी मूल दत्तक घेतल्यावर वडिलांची भूमिका निभावताना होत असेल तर आई आणि वडील दोन्ही भूमिका निभावून मूल वाढवताना भावनिकदृष्ट्या कदाचित तारांबळ होत असेल तर काही ठिकाणी हे नातं हळुवारपणे निभावलं जात असेल.

– डॉ. नीलम ताटके

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)