बदलती नाती पणजी-आजी

काळ बदललाय तसे नातेसंबंधातही बदल होत गेलेत. नेमके काय? ते जाणून घेऊ. पणजी म्हणजे आजीजी आई, आजोबांची आई! मुळात तिला “पणजी’ असं नाव का पडलं असेल याचं मोठं कुतुहल वाटतं नाही का! आजी प्रेमळ असतेच पण पणजी त्याहून प्रेमळ असते. तरीही पणजी हे नातं आजकाल दुर्मीळ झालंय हे नक्की. करिअर, नोकरी, मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहाणं, मुलांनी ठराविक पैसे जमा झाल्यावर, घर झाल्यावर लग्न करायचं, अशा अनेक गोष्टींना महत्त्व आल्याने लग्नाचं वय वाढत गेलं. बरं! लग्न झाल्यावर सुद्धा एकमेकांचं एकमेकांशी म्हणजे नवरा-बायकोचं एकमेकांशी पटतं की नाही हे पाहण्यात 2-3 वर्षे जातात. त्यामुळे आपण आजी-आजोबा केव्हा होऊ याचीच वाट पाहावी लागते, मग पणजी-पणजोबा होणं तर दूरची गोष्ट.

एकत्र कुटुंब पद्धतीत घरातले वयोवृद्ध व्यक्ती सर्व निर्णय घेत असत. त्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्य मर्यादित होते. मुलीचं लग्न अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर व्हायलाच हवं असा जणू नियमच होता. जोडीदार ओळखीतला किंवा लांबच्या नात्यातला असल्याने फार चिकित्सा केली जात नसे. त्यामुळे लग्न जमायला वेळ लागत नसे आणि पणजीपद मिळायलाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका पणजीला तिच्या पणतीविषयी विचारलं तर ती इतकी भरभरून बोलली. “नात ही जर दुधावरची साय म्हणत असू तर पणती म्हणजे सायीवरचं लोणी आहे.’ पणती केव्हाही भेटायला आली तरी मिठी मारते, आमच्या गप्पा होतात. ती लहान असताना आम्ही दोघी भातुकली खेळायचो, मी तिला गोष्टी सांगायची. मी तिचा अभ्यास करून घेत होते. आम्ही बाहुला-बाहुलीचे लग्नही लावले होते. आता पणती मोठी झालीय. नृत्य करते तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला तिला मी हवीच असते.

पणती झाली त्याचा मला इतका आनंद झाला की डोळ्यात अश्रू उभे राहिले. तिला मी लहान असताना चॉकलेट द्यायची तर आता ती मला चॉकलेट देते,’ इतकं प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं नातं. पणतीच्या यशाचं पणजीला कोण कौतुक असतं.

पण एक पणजी अशीही की जिला पणती सतत हिडीस फिडीस करणारी तिच्या कुठल्याही प्रश्‍नांना धड उत्तरं न देणारी, तिनं प्रेमानं कधी जवळ घ्यायचं म्हटलं तर तिचे हात झटकून टाकणारी, आई-वडिलांना तिच्याविषयी खोटं सांगून तिला बोलणी खायला लावणारीही आहे आणि याचं कारण म्हणजे त्या पणतीला घरातली मोठी माणसंच नीट वागवत नाहीत, त्या पणजीला काय वाटत असेल?

पणजी-पणजोबा होणं दुर्मीळ असल्याने पणती-पणतू झाल्यावर बकुळीची चांदची किंवा सोन्याची फुलं उधळायची पद्धत आहे तर काही ठिकाणी होम हवनही केलं जातं, जी पणजी हौशी असते ती तिला स्वतःला जमेल तसं स्वःच्या हातांनी पणतीला/ पणतुला दुपटं शिवते. प्रत्येक सणाला त्याला भेटी देते.

पणती दुसऱ्या गावी राहणारी असेल तर पणजीला तिची ओढ लागते. अधूनमधून आण गं भेटायला! असे निरोप येतात. अशा भेटीत पणतीही तिच्याशी प्रेमाने बोलते, बरं वाटत नाही का म्हणून विचारते, प्रेमाने तिच्या तोंडावरून हात फिरवते आणलेला खाऊ भरवते, गोड नातं!

पूर्वीची पणजी आणि आताची पणजी यांच्यात मात्र बदल झाला आहे. पूर्वीची पणजी आलवण नेसलेली, सतत स्वयंपाकघरात असलेली विधवा असलेल्या सणावाराच्या स्वयंपाकात भाग न घेता कोपऱ्यात बसून राहणारी, लिहिता वाचता येत असेल तर पोथ्या वाचणारी, तिच्या वावरण्याची मर्यादा फक्त माजघरापर्यंत असायची. ती सोशिकपणे सगळं सहन करणारी तिचं अस्तित्व इतरांना क्वचितच जाणवायचं, ती मोकळेपणाने हिंडणार ती परदारात ते मागच्या अंगणात!

आताची पणजी बदललीय कथा, कादंबऱ्या वाचणारी, मालिका पाहणारी, ऐकू येत नसेल तर श्रवणयंत्र लावून गप्पात सहभागी होणारी. एखादी पणजी स्वतःकडे थोडे पैसे राखून असलेली आहे. तिलाही चार मैत्रिणी आहेत आणि हे मैत्र सुखावणारे आहे.

– डॉ. नीलम ताटके


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)