बटाटा महागला!

पिंपरी – पिंपरी बाजारात बटाट्याची आवक कमी झाल्याने बटाट्याचे भाव वधारले आहेत. 20 रूपये किलोने मिळणारा बटाटा 25 रूपये किलो झाला आहे. यामुळे नागरिकांनी बटाट्याकडे पाठ फिरवली असल्याची माहिती विक्रेते आसिफ बागवान यांनी दिली आहे. एवढा आठवडाभर बटाट्याचे भाव चढेच राहण्याची शक्‍यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरात बटाट्याची आवक मोशी, चाकण आणि गुलटेकडीवरून मोठ्या प्रमाणात होते. येथे आग्रा, गुजरात आणि इंदौरमधून आवक होत असते. परंतु, येथून आवक कमी झाल्याने बाजारात बटाट्याची आवक घटली आहे. गुलटेकडी बाजारात बटाट्याच्या 18 गाड्या दाखल झाल्या आहेत. पिंपरी बाजारातही गेल्या दोन आठवड्यापासून बटाटा दाखल झाला नाही. त्यामुळे व्यापाऱ्याकडे असलेला बटाट्याचा कोटा संपला असल्याने भाव वधारले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून बटाट्याने विक्रेत्यांना खूष ठेवले होते. त्याचे भाव 15 ते 20 रूपये किलोच्या दरम्यान राहिले. मात्र, आता हा दर 25 रुपयांवर पोहचला आहे. रोजच्या जेवनात बटाटा उपयोगी असल्याने त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. घरगुती वापरापेक्षा हॉटेलमध्ये बटाटा अधिक लागतो. मात्र, हॉटेल व्यावसायिक बटाट्याचा साठा करुन ठेवतात. त्यामुळे त्यांच्यावर दर वाढीचा जास्त फरक पडत नाही. मात्र, सामान्य ग्राहकांना भाववाढीचा सामना करावा लागतो. दरवाढीमुळे सध्या ग्राहकांनी बटाटा खरेदीकडे पाठ फिरवल्याचे आसिफ बागवान यांनी सांगितले.

कांद्याची आवक बाजारात जास्त असल्याने त्याचे भाव गुणवत्तेनुसार 15 ते 18 रूपयांच्या दरम्यान आहेत. गेल्या काही आठवड्यापूर्वी कांद्याची विक्रमी आवक बाजारात झाली होती. परंतु, त्याचे भाव “जैसे थे’ होते. आता बाजारातील आवक घटली असूनही भावात कोणतीही वाढ न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

बटाटा हा बाहेरच्या राज्यातून येत असल्याने कधी जास्त येईल तर कधी कमी येईल हे निश्‍चित सांगता येत नाही. बटाट्याची आवक वाढल्यास भाव कमी होतील. आवक अशीच राहिली तर अजून भाव वाढण्याची शक्‍यता आहे.
– आसिफ बागवान, भाजी विक्रेता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)