“बजाज’चा प्रश्‍न आता कामगार उपायुक्‍तांच्या “कोर्टा’त

– सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरुच
– आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा

पिंपरी – बजाज कामगारांचा वेतनवाढ करार व निलंबित कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी आज सलग तिसऱ्या दिवशी बेमुदत उपोषण सुरु होते. या प्रश्‍नावर कामगार उपायुक्तालयात उद्या (गुरुवारी) विश्‍व कल्याण कामगार संघटना व व्यवस्थापन यांची बैठक होणार असून कामगारांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, शहरातील विविध कामगार व सामाजिक संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे.

बजाज ऑटो कंपनीच्या आकुर्डी व चाकण प्रकल्पातील कामगारांचा एप्रिल 2016 ते मार्च 2019 या कालावधीचा वेतनकरार रखडला आहे. याबाबत व्यवस्थापनासोबत कामगार संघटनेच्या अनेक बैठका होवूनही यावर तोडगा निघाला नाही. तसेच कंपनी व्यवस्थापनाने विविध कारणाखाली 14 कामगारांचे निलंबन केले आहे. या कामगारांवर आकसबुध्दीने कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत त्यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी यापूर्वी दोनदा आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, व्यवस्थापन दाद देत नसल्याचा आरोप करत विश्‍व कल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी आकुर्डीतील बजाज ऑटो कंपनीच्या समोरील शहीद दत्तात्रय पाडाळे यांचा पुतळा येथे बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

तथापि, विश्‍व कल्याण कामगार संघटनेने या प्रश्‍नावर कामगार उपायुक्तांकडे दाद मागितली आहे. त्यानुसार, कामगार उपायुक्तांनी उद्या दुपारी तीन वाजता कामगार संघटना तसेच व्यवस्थापन यांची बैठक बोलावली आहे. याप्रकरणी बैठकीत सकारात्मक चर्चा होईल, अशी अपेक्षा कामगारांना आहे. या बैठकांना गैरहजेरी लावून व्यवस्थापनाने या प्रश्‍नी चालढकल करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन तीव्र करण्याच्या हलचाली कामगार संघटनेने केल्या आहेत. आज (बुधवारी) सलग तिसऱ्या दिवशी उपोषण सुरु होते.

आंदोलनाला श्रमिक एकता महासंघाशी संलग्न विविध कामगार संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. बॉस चॅसीस युनियन, पद्‌मजी पेपर मिल, जनरल मोटर्स, सॅण्डविक एशिया, थरमॅक्‍स कामगार संघटना यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीही आंदोलनास पाठिंबा देत कामगारांना मार्गदर्शन केले. इंडस्ट्री ऑल ग्लोबल युनियन जिनेव्हा स्विर्त्झलॅंडचे सरचिटणीस वॉल्टर सॅनचेस यांनीही बजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांना ई-मेलव्दारे समन्वयाने तोडगा काढण्याबाबत आवाहन केले आहे.

कामगारांचा नष्टा, जेवणावर बहिष्कार
विश्‍व कल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी बेमुदत उपोषण सुरु केले असताना आकुर्डी प्रकल्पातील 110 तर चाकण प्रकल्पातील 850 कामगारांनी मागील तीन दिवसांपासून चहा, नाष्टा व जेवणावर बहिष्कार टाकला आहे. आंदोलन सुरु होवून तीन दिवस होवूनही व्यवस्थापनाने कोणत्याही हलचाली न केल्या नाहीत. व्यवस्थापनाकडून चर्चेसाठी कोणीही पुढे आले नाही. याबाबत कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विश्‍व कल्याण कामगार संघटनेने आंदोलन सुरु करण्यापूर्वी वेतनवाढ करारप्रश्‍नी चर्चा झाली आहे. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी कंपनी व्यवस्थापन सकारात्मक आहे. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याऐवजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी समोर यावे. याबाबत व्यवस्थापनाकडून कामगार संघटनेला आवाहनही करण्यात आले आहे. कामगारांच्या हितासाठी चर्चा करायला व्यवस्थापन सदैव सकारात्मक आहे. लवकरात लवकर या प्रश्‍नावर तोडगा निघेल.
– कैलास झांझरी, वरीष्ठ उपाध्यक्ष, बजाज ऑटो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)