बजरंग पुनियाला सुवर्ण, कुस्तीगिरांची आगेकूच

गोल्ड कोस्ट  – युवा कुस्तीगीर बजरंग पुनियाने सर्व फेऱ्यांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर लक्षणीय वर्चस्व गाजविताना पुरुषांच्या 65 किलो गटांत सुवर्णपदक पटकावीत भारताला 21व्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. भारतीय कुस्तीगिरांचे या स्पर्धेतील हे तिसरे सुवर्णपदक ठरले. याआधी सुशील कुमार (74 किलो) आणि राहुल आवारे (57 किलो) यांनी भारताला कुस्तीतील पहिली दोन सुवर्णपदके मिळवून दिली होती. मात्र गतविजेत्या बबीता फोगटला महिलांच्या 53 किलो गटांत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

हरयाणाच्या 24 वर्षीय बजरंग पुुनियाने पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारांच्या अंतिम फेरीत वेल्सच्या केन चॅरिगचा 10-0 असा धुव्वा उडविताना सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. ग्लासगो-2014 राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या बजरंगने या वेळी मात्र आपल्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर ठेवली नाही. त्याने सर्व फेऱ्यांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या फरकाने एकतर्फी विजयाची नोंद केली. बजरंगने पहिल्या फेरीत न्यूझीलंडच्या ब्राहम रिचर्डसला, उपान्त्यपूर्व फेरीत नायजेरियाच्या अमास डॅनियलला, तर उपान्त्य फेरीत कॅनडाच्या व्हिन्सेंट डी मेरिनिसला सहज पराभूत केले.

   पूजा धांडा व मौसम खत्रीला रौप्य

पूजा धांडाने महिलांच्या 57 किलो, तर मौसम खत्रीने पुरुषांच्या 97 किलो फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. पूजा धांडाने अंतिम फेरीत नायजेरियाच्या ओडुनायो ऍडेकुरोयेविरुद्ध संथ प्रारंभानंतर पिछाडीवर पडल्यावर निकराचा प्रयत्न केला. परंतु तिला अखेर 5-7 असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मौसम खत्रीने उपान्त्यपूर्व फेरीत सायप्रसच्या अलेक्‍सिऑस काऊस्लिडिसला, तर उपान्त्य फेरीत नायजेरियाच्या सोसो तामाराऊला पराभूत करीत अंतिम पेरी गाठली. परंतु त्याला अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या मार्टिन इरॅस्मसविरुद्ध 2-12 असा पराभव पत्करावा लागला.

  भालाफेकपटू नीरज अंतिम फेरीत

भारताचा ज्युनियर विश्‍वविक्रमवीर व युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेकीत अंतिम फेरीत धडक मारली. तसेच भारताच्या विपिन कसानानेही नीरजसह अंतिम फेरी गाठली. नीरजने पहिल्याच संधीला 80.42 मीटर भालाफेक करीत पात्रता निकष पूर्ण केला. तसेच विपिन कसानानेही पहिल्याच प्रयत्नांत 78.88 मीटर फेक करताना अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. नीरजने आपल्या कामगिरीचे श्रेय जर्मन प्रशिक्षक उवे हॉन यांना दिले. तसेच आपल्यासोबत प्रशिक्षण घेणारी ऑसी भालाफेकपटू कॅथरिन मिचेल हिचाही त्याने आवर्जून उल्लेख केला. कॅथरिनने राष्ट्रकुल स्पर्धेतील महिलांच्या भालाफेकीत रौप्यपदक मिळविले आहे.

स्क्‍वॉशपटू दीपिका-सौरव अंतिम फेरीत

दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल या भारतीय जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेतील मिश्र दुहेरी स्क्‍वॉश स्पर्देच्या अंतिम फेरीत धडक मारताना आणखी एका पदकाची निश्‍चिती केली आहे. उपान्त्य फेरीच्या लढतीत दीपिका व सौरव या जोडीने न्यूझीलंडच्या जोएल किंग आणि पॉल कोल या अग्रमानांकित जोडीचे आव्हान 2-1 असे मोडून काढताना सनसनाटी निकालाची नोंद केली. एकूण 50 मिनिटे रंगलेल्या या लढतीतील पहिली गेम भारतीय जोडीने 9-11 अशी गमावली. परंतु झुंजार पुनरागमन करताना त्यांनी पुढची गेम 11-8 अशी जिंकून 1-1 असी बरोबरी साधली आणि तिसऱ्या गेममध्ये 11-10 अशी बाजी मारताना अंतिम फेरी गाठली. महिला दुहेरीत दीपिका व जोश्‍ना चिनाप्पा या गतविजेत्या जोडीने उपान्त्य फेरीत धडक मारली. मात्र पुरुष दुहेरीत विक्रम मल्होत्रा व रमित टंडन या जोडीला उपान्त्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)