बगीचा आरक्षण भूसंपादन विषयाच्या विरोधात सर्वपक्षीय सरसावले!

  • आंदोलनाच्या पवित्र्यात : येत्या सोमवारी शहरात धरणे

लोणावळा – लोणावळा धरणाजवळील बगीचा (उद्यान) आरक्षण भूसंपादनाला विरोध दर्शवित लोणावळा शहरातील सर्वपक्षीय नेते जनआंदोलन उभारण्याच्या पवित्र्यात आहेत. मात्र तत्पूर्वी एक इशारा म्हणून येत्या सोमवारी (दि. 16) शहरात सर्वपक्षीय धरणे आंदोलन जाहीर करण्यात आले आहे. 64 गुंठे जागेत विकसित होणाऱ्या बगीचासाठी करदात्यांच्या खिशातील सुमारे आठ कोटींच्या निधींचा चुराडा होणार असल्याने सर्वपक्षीय एकवटले आहेत.

नगरपरिषद हद्दीमधील लोणावळा धरणाला लागून बगीचासाठी (उद्यान) आरक्षित असलेली जागा संपादित करण्याविषयीचा ठराव 22 सप्टेंबर 2017 रोजी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला होता. मात्र त्यावेळी हा ठराव नऊ विरुद्ध 11 मतांनी नामंजूर करण्यात आला होता. सध्या हा ठराव 308 कलमाचा अधार घेत जिल्हाधिकारी यांच्यापुढे अपिलात सुनावणीसाठी असून, हा ठराव पुन्हा सभागृहात मंजुरीसाठी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सभागृहापुढे हा ठराव येण्यापूर्वीच त्याला विरोध सुरू झाला आहे.

या सर्व प्रकरणाला विरोध म्हणून लोणावळ्यात नुकतीच एक सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेना शहर प्रमुख सुनील इंगुळकर, महिलाध्यक्ष शादान चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजू बोराटी, महिलाध्यक्ष मंजूश्री वाघ, मनसेचे शहराध्यक्ष भरत चिकणे, आरपीआयचे शहरप्रमुख कमलशील म्हस्के या ठरावाला विरोध करणारे नगरसेवक दिलीप दामोदरे, शिवदास पिल्ले, अंजली कडू, सिंधू परदेशी, कल्पना आखाडे, गौरी मावकर, सेजल परमार यांच्यासह बाळासाहेब कडू, यशवंत पायगुडे, नारायण पाळेकर, मधुकर पवार, रवी पोटफोडे, गणेश मावकर, सनी पाळेकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

बगीचा आरक्षणाला विरोध करताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी आपला पक्ष सत्तेत असला तरीही जनतेचे नुकसान करणाऱ्या या ठरावाच्या विरोधात आरपीआय मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले. तर शिवसेनेचा या जागेच्या आरक्षणाला पहिल्यापासून विरोध असून, जर पुन्हा हा ठराव सभागृहापुढे मंजुरीसाठी आला तर शिवसेना त्या ठरावाच्या विरोधात मतदान करेल, अशी भूमिका सेनेच्या गटनेत्या शादान चौधरी यांनी या बैठकीत मांडली. विकासाच्या नावाखाली स्वतःचा फायदा करून घेत जनतेच्या पैशाचा नाहक चुराडा करणार असेल, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरले, असा इशारा राष्ट्रवादी महिलाध्यक्ष मंजुश्री वाघ यांनी यावेळी दिला. तर मनसेने देखील याच सुरात सूर मिसळून रस्त्यावर उतरण्याचा निर्णय जाहीर केला.

…म्हणून या जागेत बगीचा नको!
बगीचासाठी संपादनाच्या प्रक्रियेत असलेल्या या बगीचा आरक्षणातील जमिनीतील बहुतांश भाग हा उच्चदाब वीज वाहिनेने बाधित आहेत. तसेच या जागेला रस्त्याचा आणि पूर रेषेचा “सेटबॅक’ बसत आहे. त्यामुळे या जमिनीची वापर लक्षात घेता या जमिनीच्या संपादनासाठी पालिकेने नाहक कोट्यवधी रुपये खर्च करणे खरच व्यवहार्य आहे का? भविष्यात जरी बगीचा तयार केला गेला तरी येथे येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी जागा कुठे उपलब्ध आहे? तसेच उच्च दाबाच्या वीजवाहिनीमुळे येथे व साडेआठ फूट उंचीपेक्षा एकही झाड लावता येणार नसल्याने येथे बगीचा खऱ्या अर्थाने विकसित होऊ शकेल का? असे अनेक प्रश्‍न त्यावेळी या ठरावावर उपस्थित करण्यात आले होते आणि आताही उपस्थित केले जात आहेत. तसेच 64 गुंठे जागेत विकसित होणाऱ्या बगीचासाठी करदात्यांच्या खिशातील सुमारे आठ कोटींच्या निधींचा चुराडा होणार असल्याने सर्वपक्षीय एकवटले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)