बगदादी पुन्हा निसटला असण्याची शक्‍यता

त्याच्या मृत्युच्या वृत्ताला दुजोरा नाही – रशिया
मॉस्को, दि. 20 – इसिसचा प्रमुख अबु बक्र बगदादी हा रशियाने गेल्या महिन्यात सीरियात केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त मध्यंतरी रशियन सुत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध झाले होते तथापी या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही असे स्पष्टीकरण रशियातर्फेच आज देण्यात आल्याने तो पुन्हा या हल्ल्यातून निसटला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे.
बगदादीच्या मृत्युच्या बातमीची अद्याप खातरजमा होऊ शकलेली नाही अशी माहिती रशियाचे उपविदेश मंत्री गेन्नाडी गातीलोव्ह यांनी दिली आहे. गेल्या 28 मे रोजी सीरियात रशियन हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात तो मारला गेला असावा अशी शक्‍यता रशियन संरक्षण मंत्रालयानेच व्यक्‍त केली होती. पण त्याविषयीची खातरजमा अजून होऊ शकलेली नाही. अमेरिकेनेही बगदादी मारला गेला असल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळू शकलेली नाही असे म्हटले आहे.
यापुर्वीही अमेरिकेने केलेल्या बॉंब हल्ल्यात तो ठार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या पण त्या हल्ल्यांतून तो बचावला होता हे नंतर स्पष्ट झाले आहे. एका हल्ल्यात तो जखमीझाल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला होंता पण तो वाचला होता. तीन वर्षांपुर्वी त्याने मोसुल येथे स्वताला खलिफा म्हणून घोषित केल्यानंतर त्याचे सार्वजनिक ठिकाणी दर्शन झालेले नाही. त्यामुळे त्याचा नेमका ठावठिकाणा अद्याप कोणालाच कळलेला नाही. ऑक्‍टोबर 2011 मध्ये अमेरिकेने बगदादीला दहशतवादी घोषित करून त्याला पकडून देण्यासाठी 25 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे बक्षिस जाहींर केले आहे. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय लष्कर त्याला शोधण्यासाठी व्यस्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)