बक्षिसे 21 प्रवेशिका अवघ्या 15

महापालिका गणेशोत्सव सजावट स्पर्धेची स्थिती

पुणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या गणेशोत्सव देखावे व सजावट स्पर्धेला यंदा अत्यल्प प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. या स्पर्धेसाठी सार्वजनिक मंडळे, सोसायट्या तसेच वैयक्तिक स्तरावर सुमारे 21 बक्षिसे देण्यात येत असली तरी, यंदा अवघ्या 14 प्रवेशिका आल्या असून त्या प्रामुख्याने सार्वजनिक मंडळे तसेच सोसायट्यांच्या आहेत. दरम्यान, या स्पर्धेसाठी मंडळे, सोसायट्या तसेच नागरिकांना येत्या सोमवारपर्यंत प्रवेश घेता येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिकेकडून दरवर्षी घेण्यात येणारी ही स्पर्धा वेगवेगळ्या कारणास्तव गाजत असते. त्यातच गेली तीन वर्षे या स्पर्धेतील विजेत्यांचे पारितोषिक वितरणच झालेले नव्हते. त्यामुळे मंडळाकडूनही नियोजन बैठकीत याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पालिकेने 2015 पासूनच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम तातडीने हाती घेतला आहे. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या स्पर्धेतील सहभाग घटत असतानाच; काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने महापालिकांना सण, उत्सवांवर खर्च करण्यास बंधने घातली आहेत. त्यामुळे यंदाही स्पर्धा होणार की, नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिकाने या स्पर्धेचे निवेदन जाहीर करण्यापूर्वी विधी विभागाच्या माध्यमातून माजी न्यायमुर्तींचा अभिप्राय मागविला होता. हा अभिप्राय सकारात्मक आल्यानंतर गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी स्पर्धेसाठीच्या प्रवेशिकांचे निवेदन जाहीर केल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच, निवेदन उशीरा आल्याने त्याचा परिणाम प्रवेशिकांवर झाला असून या प्रवेशिका 17 सप्टेंबरपर्यंत स्विकारण्यात येणार असल्याने त्यांची संख्या वाढेल, असा दावाही करण्यात आला आहे.

यंदाही पाच दिवसांनंतर परिक्षण
महापालिकेकडून स्पर्धेसाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र परिक्षण समिती नेमली जाते. या समितीकडून मंडळांचे परिक्षण केले जाते. गेल्या काही वर्षांत शहरात तीन तसेच पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होत असल्याने अनेक मंडळे तसेच घरगुती व सोसायट्यांनी भाग घेतल्यानंतर हे परिक्षक विसर्जन मिरवणुकीत पोहोचत असत, असे असतानाही यंदाही गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसापासून हे परिक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार, त्याचे वेळापत्रक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)