बंद सार्वजनिक रस्ता सुरू करण्याची मागणी

दहिवडी तहसिलदारांना निवेदन

दहिवडी, दि. 27 (प्रतिनिधी) – भालवडी, ता. माण ग्रामपंचायत हद्दीमधील पूर्वीपासून सुरू असणारा सार्वजनिक रस्ता काही शेतकऱ्यांनी बंद केला आहे. तो पुन्हा सुरू करावा, अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भालवडी गावठाणमधील इंजबाव रस्ता ते शेख वस्ती, मुलाणी वस्ती, पाटोळे वस्ती, मोरेवाडी गावठाण ते दलित वस्ती या वस्त्यांवरील ग्रामस्थांची संख्या अंदाजे दोनशेचे आसपास आहे. भालवडी गावामध्ये येण्यासाठी पूर्वीपासून बैलगाडी रस्ता, शिवार रस्ता सुरू होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधून हा रस्ता जात आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर जेसीबीने मोठे खड्डे घेतलेले आहेत. तसेच रस्त्यावर अडथळे निर्माण केले आहेत व रस्त्याची जागा शेतीसाठी वापरात आणत आहेत. याबाबत आम्ही यापूर्वी तहसीलदार माण यांना लेखी कळवून तसेच संबंधित मंडलाधिकारी यांनी चौकशी करून सुद्धा या रस्त्याबाबतचा प्रश्न सुटलेला नाही. हा रस्ता हा गावठाणच्या नकाशात आहे. रस्ता प्रश्न जर 5 ऑक्‍टोबरपर्यंत निकाली निघाला नाही तर वाडीवस्तीवरील ग्रामस्थ रस्त्याचा प्रश्न संपेपर्यंत ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषणाला कुटुंबासह बसणार असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)