बंद जलवाहिनीचे काम पूर्ण

‘ड्रोन व्हॉल्व’ उघडले : पाणी सोडून साफसफाई सुरू

पुणे – पर्वती ते लष्कर जलकेंद्रापर्यंत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे या जलवाहिनीची साफसफाई पाणी सोडून करण्यात येणार असल्याने या जलवाहिनीचे नाल्यावर असलेले “ड्रोन व्हॉल्व’ उघडले जाणार आहेत. 1 डिसेंबर 2018 पर्यंत हे काम सुरू राहणार असल्याने नाल्यात पाण्याचा प्रवाह वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नाल्यात उतरू नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

-Ads-

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका यापूर्वी खडकवासला धरणाच्या कालव्यातून पर्वती आणि लष्कर जलकेंद्रासाठी पाणी घेतले जात होते. मात्र, कालव्याला गळती असल्याने खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत बंद जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यामुळे आता महापालिकेकडून या जलवाहिनीद्वारेच पाणी घेतले जात आहे. तर, या जलवाहिनीत आलेले पाणी पुढे पर्वतीपासून लष्कर जलकेंद्रासाठी पुन्हा कालव्यात सोडले जाते.

मात्र, पर्वती ते लष्कर या 5 किलोमीटरच्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती असल्याने वर्षभरात सुमारे अर्धा टीएमसी पाणी वाया जाते. त्यामुळे 2015 मध्ये पर्वती जलकेंद्र ते लष्कर जलकेंद्रापर्यंत सुमारे 6.6 किमीची बंद जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यात तब्बल 2.2 मीटर व्यासाची जलवाहिनी टाकली जात आहे. त्यामुळे आता कालव्यातील महापालिकेला पाणी दिल्यानंतर पाण्याची गळती तसेच त्याबदल्यात पाटबंधारे विभागाला दरवर्षी 2 ते 3 टीएमसी पाण्याचे जादा पैसे देणेही बंद होणार असून सुमारे 100 कोटींची ही योजना आहे. अखेर त्याचे काम पूर्ण झाले असून डिसेंबरमध्ये ती कार्यान्वीत होणार आहे. मात्र, त्यापूर्वी त्याची साफसफाई करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी या जलवाहिनीत पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून हे जलवाहिनीत आलेले पाणी “ड्रोन व्हॉल्व’द्वारे नाल्यात सोडले जात आहे. हे पाणी जादा प्रमाणात असल्याने नाल्यात अचानक पाणी येऊन अपघात होण्याची शक्‍यता असल्याने महापालिकेने हे आवाहन केले आहे.

सफाईनंतर चाचणी
या जलवाहिनीच्या सफाईनंतर पुढील काही दिवसांत या जलवाहिनीद्वारे पर्वती ते लष्कर जलकेंद्रापर्यंत पाणी सोडून या बंद जलवाहिनीची चाचणी केली जाणार आहे. या योजनेमुळे पर्वती ते लष्कर जलकेंद्रापर्यंत कालव्यातून होणारी सुमारे 100 ते 150 एमएलडी पाण्याची गळती कमी होणार असून हे पाणी महापालिकेस उपलब्ध होणार आहे. तसेच हे काम झाल्यास महापालिका खडकवासला धरणापासून सर्व पाणी बंद जलवाहिनीद्वारेच घेणार असून हा कालवा दुरुस्तीसाठी बंद ठेवणेही शक्‍य होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)