बंद खोलीतल्या आठवणी 

डॉ. न. म. जोशी 

एका गावातील एका मंदिरात एक पुजारी राहात होते. पूजापाठ करून भक्‍तांनी जी दक्षिणा दिली त्यावर गुजराण करीत होते. काळ बदलला महागाई वाढली. भक्‍तांची वर्दळ कमी झाली. संसाराचा खर्च भागेना. पुजारी प्रामाणिक होता. गंडेदोरे देऊन लोकांना भुलवणं त्याला मान्य नव्हतं. त्याच्या एका नातेवाईकानं पुजाऱ्याला शहरात नेलं आणि तिथं त्याला एका मोठ्या मालदार व्यापाऱ्याकडं कारकुनाची नोकरी दिली. पुजारी प्रामाणिकपणे काम करीत होता. हिशेब नीट लिहीत होता. त्याच्याबरोबर आधीच दोन कारकून तिथं होते. ते मुनिम होते. त्यांना या नव्या कारकुनाची अडचण वाटू लागली. कारण ते हिशेबात घोटाळे करून पैसे खात होते. ते त्यांना आता खाता येईनात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुजाऱ्याचा कधीतरी काटा काढायचा आणि त्याला हाकलून लावायचं असं त्या दोन मुनिमांनी ठरवलं. त्यांनी पुजाऱ्यावर पाळत ठेवली. पुजारी कारकून एका लहानशा खोलीत राहात होता. रोज सायंकाळी काम संपलं की तो आपल्या मठीत जाई आणि एक तास दरवाजा बंद करून बसत असते.त्यावेळी कुणीही आलं तरी तो दरवाजा उघडत नसे. दोन मुनिमांनी या घटनेचं भांडवल करायचं ठरवलं. त्यांनी त्यांच्या मालकाचे कान फुंकले. ते म्हणाले, “धनी, हा पुजारी इथून पैसे चोरतो, खोटे हिशेब लिहितो आणि मग घरी बंद दरवाजाआड बसून पैसे मोजत बसतो. गावी पाठवून देतो. तुम्ही स्वतः बघा आणि खातरजमा करा.’

मालकाच्याही मनात चलबिचल झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मालक स्वतः गुपचूप पुजाऱ्याच्या खोलीकडे गेला. दरवाजा बंद होता. मालकाने मुद्दामच दार वाजवलं नाही. मागच्या खिडकीतून त्यानं डोकावून पाहिलं. पुजारी त्याची पेटी उघडून बसला होता. त्यातून त्यानं गावातील देवळातील मूर्तीची तसबीर बाहेर काढली. ती पुढे हात जोडून तो मनोभावे प्रार्थना करत होता. “पोटासाठी देवा तुला सोडून आलो. क्षमा कर. गावाची आठवण खूप येते. लवकरात लवकर मला पुन्हा सेवेत घे.’ मालक थक्क झाले. त्याचा हा सद्‌भाव पाहून त्यांनी चुगलखोर मुनिमांना पदावरून दूर केलं आणि याला मुख्य मुनिमाची जागा दिली.

कथाबोध 
पोटासाठी देश सोडला तरी माणसानं मातीला विसरू नये. आणि आपला सदाचार कधी मागे ठेवू नये. प्रगतीच्या शिड्या कितीही पार केल्या तरी सद्‌वर्तनाची पायरी विसरू नये. पुजारी बाबांनी हेच केलं. म्हणून ते मुख्य मुनिम झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)