बंद एसटीच्या आडोशाला प्रवाशांनी शोधली सावली

निमसाखर- निमसाखर (ता. इंदापूर ) येथे नुकतेच एसटी महामंडळाची एक बस तांत्रिक बिघाड झाल्याने चौकातच बंद पडली. खिळखिळ्या झालेल्या या बसचा फटका मात्र ऐन दुपारच्या वेळी प्रवाशांना बसला आणि तळपत्या उन्हातून बचावासाठी याच एसटीच्या आडोशाला सावलीसाठी त्यांना थांबावे लागले.
कळंब – बावडा या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून वाहनांची वर्दळ वाढली आहे. इतर वाहनांबरोबरच एसटी महामंडळाच्या बस देखील या रस्त्यावरून धावत असतात. महामंडळाची बारामती-पंढरपूर ही बस निमसाखर चौकात आली, काही प्रवासी या बसमध्ये चढले, त्यानंतर काही अंतर बस पुढे गेली आणि तिथेच बंद पडली. ही घटना निमसाखर येथे नुकतीच घडली असून, असे प्रकार सातत्याने घडत आहेत.
चालकाने उशिरापर्यत बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस काही केल्या सुरू होईना. शेवटी भर दुपारची वेळ असल्याने बंद पडलेल्या बसमधून प्रवासी खाली उतरले आणि जवळपास कोठेच सावली असणारी जागा नसल्याने त्यांनी एसटी बसच्या आडोशाचा आधार सावलीसाठी घेतला. या बसमध्ये अबालवृद्ध होते. बऱ्याच प्रयत्नानंतर बस सुरू करण्यास चालकाला यश आले आणि त्यानंतर ही बस पंढरपूरकडे रवाना झाली. वेगवेगळ्या करणांनी बस बंद पडण्याचे प्रकार या मार्गावर वाढले असून, त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यामुळे महामंडळाचे अधिकारी अशा मोडकळीस आलेल्या बसच्या दुरुस्तीबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशी वर्गातून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)