पिंपरी – गणरायाच्या प्रतिष्ठापनेच्या धामधुमीत शासकीय यंत्रणाला कामाला लागली असताना बंदी डावलून थर्माकोलचे मखर रस्त्यावर जागोजागी विकले जात असल्याचे गुरुवारी (दि. 13) पहायला मिळाले.

महाराष्ट्र शासनाने प्लॅस्टिकसह थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने देखील सजावटीसाठी थर्माकोलचा वापर न करण्याचे आवाहन केले होते. महापालिकेच्या पथकांमार्फत तपासणी देखील करण्यात येत होती. कारवाईच्या भितीने थर्माकोलच्या मखर विक्रेत्यांनी कालपर्यंत मखर बाहेर काढले नव्हते.

तथापि, गणेशोत्सवाला आजपासून सुरूवात होत असल्याने तसेच श्रींच्या प्रतिष्ठापनेनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका व पोलीस यंत्रणा कामाला लागली असताना विक्रेत्यांनी त्याचा फायदा घेत थर्माकोलचे मखर विक्रीसाठी आणले. गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल असलेल्या ठिकाणी तसेच रस्त्यावर जागोजागी थर्माकोलच्या मखरची विक्री करण्यात येत होती. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत स्वस्तात मखर विक्री होत असल्याने नागरिकांचीही खरेदीसाठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे थर्माकोल बंदीमुळे पर्यावरण पूरक मखर तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना त्याची मोठी झळ बसली.

थर्माकोल बंदीमुळे यंदा अल्प कालावधीत पर्यावरण पूरक मखर तयार केले. नागरिकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, गणरायाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी थर्माकोलचे मखर विक्रेते गतवर्षीचा उरलेला माल रस्त्यावर विक्रीसाठी मोठ्‌या प्रमाणावर उतरले होते. फुकटात विल्हेवाटीऐवजी विक्री करुन पैसे मिळत असल्याने त्यांनी स्वस्तात थर्माकोलची मखर विक्री केली. स्वस्त मखराचा पर्याय मिळाल्याने नागरिकांनी पर्यावरण पूरक मखराऐवजी थर्माकोलच्या मखराला पसंती दिली. त्यामुळे ऐन खरेदीच्या दिवशी पर्यावरण पूरक मखर विक्रेत्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला.
– सागर सुरडी, पर्यावरण पूरक मखर विक्रेता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)