बंदिस्त गटार योजनेचे तीन तेरा

निमसाखरला नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात : सत्ताधारी अनभिज्ञ

निमसाखर- निमसाखर (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीकडून मध्यंतरीच्या काळामध्ये बंदिस्त गटार योजनेचे काम झाले. मात्र, हे दूषित व दुर्गंधीयुक्‍त सांडपाणी मारुती मंदिर परिसरात सोडले आहे. मंदिर परिसरात हे पाणी सोडल्यामुळे निमसाखरकरांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्यामुळे परिसरात संतापाचा सूर आळवळा जात आहे.
तालुक्‍यातील राजकारण, समाजकारण व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या निमसाखरमध्ये मुलभूत सुविधांची भर पडली असताना त्यात आता समस्यांची भर पडत आहे. यापूर्वी विकासकामे होत असताना सर्वसामान्य व्यक्‍ती केंद्रबिंदू मानून कामकाज होत होते. त्यावेळी ग्रामसभांना मोठी गर्दी असायची. ग्रामसभांमधून तात्विक वाद- विवाद होत होते. चर्चेतून मार्ग काढत विकासकामे मार्गी लागत होती. पूर्वीच्या ओपन गटार योजना होत्या. ती गटार योजना गावच्या वेशीतून पुढील मोकळ्या जागेत वृक्षारोपण केलेल्या झाडांना हे पाणी जात होते. यानंतर मात्र “नवा गडी, नवा राज’ याप्रमाणे नव्याने आलेल्या योजना पुढे आल्या. यामध्ये रस्त्याच्या मधोमध खोदून सिमेंटचे मोठ्या पाईप टाकून त्या ठिकठिकाणी गावातील सांडपाणी चेंबरच्या माध्यमातून बंदिस्त गटार योजनेच्या गटारामधून सांडपाणी प्लॅस्टिक पाईपव्दारे सोडले गेले. या योजनेचे ग्रामस्थांनी स्वागत केले होते. मात्र, या कालावधीत बंदिस्त गटार योजना ग्रामस्थांच्या भावनिकतेला तडा देणारी ठरत आहे. गावचे श्रद्धास्थान मारुती मंदिरामागील भागात गावातील सांडपाणी बंदिस्त गटार योजनेच्या माध्यमातून पाणी सोडले आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मारुती मंदिर व परिसरात दर्शनासाठी येत असताना भाविक आणि नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. परिसरात साठलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. याचा परिणाम नागरी वस्तीमध्ये आजाराचे प्रमाण सर्वसामान्य ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वारंवार ग्रामस्थांनी मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्‍त होत आहे.
स्थानिक पातळीवर विकास कामे लोकसहभागातून विचारातून होणे जरुरीचे असते. मात्र, ग्रामसभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करूनही ग्रामसभेसाठी कोरम पूर्ण होत नाही. हे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. यापूर्वी निमसाखर ग्रामपंचायतीचे कै. कृष्णराव रणवरे यांच्याबरोबरच माजी सरपंच शिवाजीराव रणवरे यांसह अनेक सरपंचांनी गावची धुरा सांभाळली. मात्र, त्यांच्या काळात जेवढ्या पायाभूत सोयी, सुविधा झाल्या. तेवढ्या छोट्या मोठ्या कामात आजही त्या नेत्यांकडून डांगोरा पिटला जात आहे. यामुळे ग्रामस्थांमधून असंतोष उफाळला आहे.

  • निमसाखर ग्रामपंचायकडून गेल्या काही महिन्यांपूर्वी माझा कार्यकाळ सुरु होण्याअगोदर बंदिस्त गटार योजनेचे काम झाले आहे. या बंदिस्त गटार योजनेचे पाणी दुसरीकडे वळता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
    – संगीता लवटे, सरपंच, निमसाखर.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)