बंदमुळे काही राज्यांमध्ये सार्वजनिक जनजीवन विस्कळीत 

नवी दिल्ली – विरोधकांनी पुकारलेल्या “भारत बंद’मुळे आज काही राज्यांमधील सार्वजनिक जनजीवन विस्कळीत झाले. कार्यालये आणि शिक्षण संस्था बंद राहिल्या आणि रस्त्यांवरील वाहतुकीची वर्दळही कमी राहिली होती. हिंसाचाराच्या काही क्षुल्लक घटना वगळता देशभरात बंद शांततेत पार पडला. देशभरातील 21 विरोधी पक्षांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा बंद पुकारला होता.
केरळ, कर्नाटक, बिहार, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशात बंदमुळे सार्वजनिक जनजीवन प्रभावित झाले होते. मात्र उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि मिझोराममध्ये बंदचा विशेष परीणाम झाला नाही. बंद असला तरी नवी दिल्लीमध्ये कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये आपल्या नियमित वेळेनुसार सुरू होती. दर्यागंज आणि रामलिला मैदानाच्या परिसरातील वाहतुक निदर्शने आंदोलनांमुळे विस्कळीत झाली होती.
ओडिशामध्येही रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. त्यामुळे किमान 10 प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकही अडवली होती. बस, टॅक्‍सी आणि ऑटो रिक्षांची वाहतुक बंद होती. भुवनेश्‍वरमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी “रस्ता रोखा’ आंदोलन करून वाहतुकीत अडथळा निर्माण केला. तर सूर्यमंदिराच्या तिकीट विक्री खिडकीलाही टाळे ठोकण्यात आले. दुकाने, बाजारपेठा, औद्योगिक आणि शैक्षणिक संस्था बंद राहिल्या. बिजू पटनाईक तंत्रज्ञान विद्यापिठातील परीक्षाही आज रद्द करण्यात आल्या होत्या.
केरळमध्येही खासगी आणि सार्वजनिक वाहतुक बंद राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले. तेलंगणामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बस वाहतुकीस अडथळा करणाऱ्या कॉंग्रेस, डाव्या आणि तेलगू देसम पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उस्मानिया विद्यापिठातील पी.एच.डीची प्रवेश परीक्षा उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली.
कर्नाटकमध्येही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बेंगळूरुमध्ये सार्वजनिक बस, खासगी टॅक्‍सी आणि ऑटोरिक्षा बंद होत्या. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. मेंगळूरुमध्ये उघडलेल्या काही हॉटेल आणि दुकानांवर दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या. झारखंडमध्ये दुकारे जबरदस्तीने बंद करायला लावणाऱ्या कॉंग्रेसच्या 56 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पश्‍चिम बंगालमधील बहुतेक सर्व शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र तेथील परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पार पडल्या.
तामिळनाडूमध्ये बंदचा विशेष परीणाम झाला नाही. ऑटोरिक्षा संघटनांनी बंदमध्ये सभाग घेतल्याने रस्त्यांवर वाहने नव्हती. तामिळनाडूतून केरळमध्ये जाणाऱ्या बस बंद होत्या.
3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू 
गया जिल्ह्यातील एका गावातील प्रमोद मांझी यांच्या 3 वर्षाच्या मुलीला उलट्या व्हायला लागल्याने तिचे पालक तिला रुग्णालयात न्यायला निघाले मात्र रुग्णालयात नेण्यासाठी वाहन मिळू न शकल्याने त्या मुलीचा मृत्यू झाला, बंद दरम्यान वाहतुक रोखून धरल्याने मांझी कुटुंबीयांना रिक्षा मिळू शकली नाही, असा आरोप भाजपने केला आहे. बिहारमध्ये काही ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)