फ्ल्केझी खात्यासाठी 13 बॅंकांचे अर्ज

– महापालिकेकडून मागविले होते प्रस्ताव
– 13 राष्ट्रीयकृत बॅंकांचे प्रस्ताव
– सर्वाधिक व्याज देणाऱ्या बॅंकेत उघडले जाणार खाते
 
पुणे – जमा होणारे उत्पन्न यापुढे पालिकेकडून फ्लेक्‍झी बॅंक खात्यात ठेवले जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यासाठी सुमारे 13 बॅंकांनी प्रस्ताव पाठविले असून सर्वाधिक व्याज देणाऱ्या बॅंकेत पालिकेकडून हे खाते उघडले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे वर्षाला सुमारे 100 ते 125 कोटींचे उत्पन्न सहज शक्‍य असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी जमा बाजू निश्‍चित करण्यात आलेली असते. त्यात बांधकाम विकास शुल्क, मिळकतकर, जीएसटी अनुदानासह महापालिकेच्या इतर परवान्यांचे शुल्क तसेच दंडाची रक्‍कम, शासकीय अनुदान, ठेकेदारांच्या ठेवींची अनामत रक्‍कम अशा वेगवेगळ्या उत्पन्नाचा समावेश आहे. हे सर्व उत्पन्न महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये असलेल्या पालिकेच्या चालू खात्यात (करंट अकाऊंट)मध्ये जमा केले जाते. त्यावर सध्या महापालिकेस काहीच व्याज मिळत नाही. तसेच हे खाते बचत खाते नसल्याने त्यावर मिळणारे मर्यादित व्याजही पालिकेस मिळत नाही. त्यामुळे या उत्पन्नाचे व्याज मिळविण्यासाठी महापालिकेकडून वेगवेगळे उपाय योजले जात आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या अंतर्गत महिनाभरापूर्वीच राज्य शासनाच्या 2015 च्या एका आदेशाचा आधार घेत, महापालिकेने नुकत्याच आपल्या ठेवी राष्ट्रीयकृत बॅंकेतून काढून 4 हजार कोटींपेक्षा नेटवर्थ असलेल्या आरबीआयच्या शेड्यूल 2 मधील बॅंकांमध्ये ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता पालिकेचे जमा होणारे उत्पन्न फ्ल्केझी खात्यात ठेवण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रीयकृत बॅंकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार सुमारे 13 बॅंकांनी आपले प्रस्ताव महापालिकेस सादर केले आहेत. या प्रस्तावांची छाननी करून अंतिम निर्णयासाठी महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. त्यानंतर बॅंक निश्‍चित करून 1 जानेवारीपासून हे खाते सुरू केले जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)