फ्लेक्‍सवर झळकण्याची घाई; पोलिसांच्या रडारवर अल्पवयीन भाई

भविष्यातील गुंड रोखण्याचा पोलीस आयुक्‍तांचा “भरोसा’

– संजय कडू

-Ads-

पुणे – शहरात चौकाचौकांत पोस्टरवर झळकणाऱ्या अल्पवयीन मुलांचे रेकॉर्ड पोलीस प्रशासन तयार करत आहे. यातील किती मुले गुन्हेगारांच्या संपर्कात तसेच प्रत्यक्षात गुन्हेगारीत सहभागी आहेत, याची माहिती काढली जात आहे. या अल्पवयीनांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या “भरोसा सेल’मध्ये एक केंद्र असेल. अल्पवयीनांना वेळीच गुन्हेगारीपासून रोखले, तर भविष्यात निर्माण होणारे गुंड तयार होणार नाहीत, यासाठी खुद्द पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांनीच पुढाकार घेतला आहे.

समाजातील काही घटकांतील अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे मोठे आकर्षण आहे. आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे ही मुले गल्लीतील भाई लोकांकडे आकर्षित होतात. भाई लोकांची लाइफस्टाइल “फॉलो’ करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. यासाठी भाई लोकांच्या आसपास फिरतात. भाईने पान, सिगारेट, तंबाखू, गाडीत पेट्रोल टाकून आणणे अशी सांगितलेली सर्व कामे आनंदाने केली जातात. या बदल्यात त्यांना खायला-प्यायला मिळते. शिवाय भाईच्या गोटातही फिरता येते. यानंतर हळूहळू भाईच्या मर्जीत उतरल्यावर प्रतिस्पर्धी गटाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, परिसरात आलेल्या इतर गटांच्या मुलांना दमदाटी करणे, कोयता, बांबू, गज घेऊन दुसऱ्या परिसरात दहशत माजवणे अशा कामाला या मुलांना लावले जाते. यातूनच पुढे छोट्या-मोठ्या चोऱ्या, जबरी चोरी, लुटालुटीच्या प्रकारांत ते सहभागी होतात. यानंतरच आपसूकच मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि खून अशा गंभीर गुन्ह्यांमध्येही त्यांचा सहभाग दिसतो.

मिसुरड फुटण्याच्या आतच चमकोगिरी
शहरातील कोणत्याही चौकात बघितले असता, मोठमोठ्या फ्लेक्‍सवर मिसुरडही न फुटलेल्या अल्पवयीन मुलांची छायाचित्र शुभेच्छुक म्हणून दिसतात. त्यांनी केसांचे वेगवेगळे विचित्र कट, रंगीबेरंगी गॉगल आणि विचित्र शर्ट दिसतो. एखाद्या थोर व्यक्तीच्या जयंतीदिनी तर फ्लेक्‍स लावायची स्पर्धाच असते. अनेकांनी आपली टोपणनावेही भाई, बाबु, राजे, शेठ अशी “उर्फ’ म्हणून ठेवलेली दिसतात. या झळकणाऱ्या मुलांकडे बघून इतरही मुले फ्लेक्‍सवर झळकण्यासाठी धडपड करतात. पोस्टरवर झळकण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. यासाठी पोस्टरवर झळकलेल्या एखाद्या भाईच्या संपर्कात येतात. त्याचा वाढदिवस तसेच एखाद्या महान व्यक्तीच्या जयंतीच्या पोस्टरवर झळकताच त्यांना आकाश ठेंगणे होते. या मुलांच्या या आकर्षणाचा नेमका फायदा उठवून त्यांना गुन्हेगारीकडे वळवले जाते.

बालगुन्हेगारी रोखण्यासाठी नेमके काय करणार?
पोलीस आयुक्‍त के. व्यंकटेशम्‌ यांचा महत्त्वकांक्षी असलेल्या “भरोसा सेल’मध्ये बालगुन्हेगारी संदर्भात एक विभाग असेल. येथे बालगुन्हेगारांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच बालगुन्हेगारीकडे वळण्याच्या मार्गावर असणाऱ्यांनाही त्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी काही समुपदेशकांची नेमणूकही केली जाणार आहे. हा उपक्रम पुढे प्रत्येक वस्तीमध्ये एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. या मुलांबरोबरच त्यांच्या पालकांचेही समुपदेशन केले जाईल.

बालगुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच इतर अल्पवयीनांनी गुन्हेगारीकडे वळू नये, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून फ्लेक्‍सवर झळकणाऱ्या अल्पवयीनांची माहिती गोळा केली जात आहे. यानंतर त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यातून ते गुन्हेगारी सोडतील किंवा त्याकडे वळणार नाहीत. यासाठी समुपदेश करणाऱ्या व्यक्ती तसेच सामाजिक संस्थांनाही सहभागी करुन घेण्यात येणार आहेत.
– शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)