‘फ्लेक्‍स’च्या वादातून तरूणाचा खून

सिंहगड रस्ता भागात घटना : दोघांसह अन्य साथीदारविरूद्ध गुन्हा, दहीहंडीचा वाद जिवावर बेतला

पुणे-दहीहंडीचा फलक (फ्लेक्‍स) लावण्याच्या वादातून सिंहगड रस्ता भागात तरूणाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडली. घरापासून 50 फुटाच्या अंतरावर त्याच्यावर सपासपा वार करण्यात आले होते. पोलिसांना याची खबर मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अक्षय अशोक घडशी (24, रा. शिवशंकर अपार्टमेंट, पेट्रोल पंपानजीक, माणिकबाग, सिंहगड रस्ता), असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी निलेश चौघुले, सागर दारवटकर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक घडशी (48) यांनी यासंदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय घडशी याचे धायरी भागात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. त्याचे वडील एका सरकारी कार्यालयात कामाला आहेत. आरोपी निलेश आणि सागर परिसरात राहायला आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. दहीहंडीचा फलक लावण्यावरून त्यांच्यात नुकताच वाद झाला होता. शुक्रवारी सायंकाळी अक्षय घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो रात्री उशीरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे त्याचे वडील अशोक घडशी यांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा त्याचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, मध्यरात्री दीडच्या सुमारास आरोपी निलेश, सागर आणि साथीदार हे अक्षय राहत असलेल्या इमारतीनजीक आले.

त्यांनी अक्षयला हाक मारली. तेव्हा वडिलांनी अक्षय घरी आला नसल्याचे त्यांना सांगितले. आरोपींकडे तीक्ष्ण शस्त्रे असल्याचे वडिलांनी पाहिले होते. त्यानंतर सिंहगड रस्त्यावरील नॅशनल पार्क सोसायटीनजीक असलेल्या पेट्रोल पंपापासून काही अंतरावर आरोपींनी अक्षयवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, सहायक निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या घटनेची माहिती अक्षयच्या कुटुंबीयांना दिली. आरोपी निलेश, सागर आणि साथीदारांनी अक्षयचा खून केल्याचे अशोक घडशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अक्षय आणि आरोपी निलेश, सागर यांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे समजते. अक्षयवर यापूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

निश्‍चित कारण तपासाअंती
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर तेथे अक्षयचा मृतदेह आढळला. तेथील काही नागरिकांनी तो अक्षय घडशी असल्याचे सांगितल्यावर त्याच्या वडिलांना याची खबर देण्यात आली. वडिलांनी मृतदेह ओळखल्यावर रितसर तक्रार दाखल करुन घेण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार मृत व आरोपींची दहीहंडी उत्सवाचा फ्लेक्‍स लावण्यावरुन काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. मात्र, निश्‍चित कारण तपासाअंतीच सांगता येईल, अशी माहिती सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)