फ्लॅटवर फ्लॅट मोफत देण्याचे आमिषाने फसवणूक करणाऱ्या बिल्डरचा जामीन फेटाळला

59 गुंतवणुकदारांची 6 कोटींची फसवणूक

पुणे – एक फ्लॅट बुक केल्यास त्यावर दुसरा फ्लॅट मोफत देण्याचे आमिष दाखवत 59 गुंतवणुकदारांची सहा कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला.
संतोष दत्तात्रय सपकाळ (वय 41, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोडपडी, मुळ रा. रहेजा वुड्‌स कल्याणीनगर) असे जामीन फेटाळलेल्या बिल्डरचे नाव आहे. याप्रकरणी निशा बालाजी कोटगिरे (वय 62, रा. दत्तविहार सोसायटी जांभूळवाडी रोड, कात्रज) यांनी सासवड पोलिसांत फिर्याद दिली होती. या प्रकरणी एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल असून, त्यात सपकाळ याच्या पार्टनर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोपींनी 2012 पासून 26 मार्च दरम्यान हा सर्व प्रकार केला. आरोपींनी दिवे येथे असलेल्या 134 गुंठे जमिनीवर सुमेर लॅन्डमार्क नावाचा प्रकल्प सुरू केला होता. त्यासाठी सपकाळ याने आरोपी पंकज नवलाखा याच्याबरोबर विकसन करारनामा केला. प्रकल्पात एक प्लॅट बुक केल्यास त्यावर एक प्लॅट मोफत देण्यात येईल, अशी जाहिरात त्यांनी केली. त्यानुसार फियार्दी यांनी 11 लाख 91 हजार रुपये भरून फ्लॅट बुक केला होता. त्यावेळी सप्टेंबर 2018 पर्यंत ताबा देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान करारनामा करून देखील आरोपींनी इमारतीचे बांधकाम सुरू केले नाही. तसेच सदनिकेच्या आणि इमारतीच्या आराखड्यामध्ये बदल केला, म्हणून फियार्दी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी सपकाळ याला अटक करण्यात आली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील सुरेश गवळी यांनी विरोध केला. आरोपी याने आतापर्यंत सहा कोटी 1 लाख 47 हजार 291 रुपयांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून त्याला जामीन मिळाला तो पुन्हा नागरिकांची फसवणूक करण्याची शक्‍यता आहे. तसेच गुंतवणुकदारांकडून घेतलेल्या पैशाचे काय केले याचा तपास करणे बाकी आहे. फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी त्याचा जामीन अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी ऍड. गवळी यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)