“फ्रॉड गॅंग’ची ज्येष्ठांवर वक्रदृष्टी

सूरज व्यास

पिंपरी – बॅंकेची माहिती विचारुन एटीएम कार्डव्दारे पैसे लुटणाऱ्या “फ्रॉड गॅंग’ची आता सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांकडे वक्रदृष्टी झाली आहे. तुमच्या पेन्शन फंडात अतिरिक्‍त मोठी रक्‍कम जमा झाली आहे, असे सांगून ज्येष्ठांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.

लॅण्डलाइनवर अथवा बऱ्याच वर्षांपासून सुरु असलेल्या मोबाइल नंबरवर कॉल करुन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्याबद्दल सर्व माहिती सांगितली जाते. इतकी वर्षे आपण नोकरी केली असल्याने पेन्शनमध्ये काही “ऍरियर्स’ जमा झाले आहेत किंवा “कंबाईड प्रोव्हिडंड फंडा’ची तीन ते चार लाखांची रक्‍कम तुमच्या नावे जमा असल्याचे सांगितले जाते. विश्‍वास जिंकून घेण्यासाठी सर्व कागदपत्रे थेट पेन्शन फंड रेग्युलेटरी ऍण्ड डेव्हलपमेंट ऍथारिटी, दिल्ली येथे पोस्टाने लवकरात लवकर पाठविण्यास सांगितले जाते.

खूपच आश्‍चर्यकारक पद्धतीने या ठगांकडे आपल्या “टार्गेट’ची संपूर्ण माहिती उपलब्ध असते. संपूर्ण नाव, आडनाव, कोणत्या विभागात किती वर्षे नोकरी केली? ही सर्व माहिती या ठगांकडे असते. जेव्हा ही माहिती ते फोनवर सांगतात तेव्हा साहजिकच ज्येष्ठ नागरिकांना वाटते की एवढी माहिती आहे म्हणजे नक्‍कीच हा फोन भविष्य निवार्ह निधी किंवा पेन्शन कार्यालयातून आला आहे. याचाच फायदा घेत हे ठग ज्येष्ठांचा विश्‍वास संपादन करतात. ही माहिती व ज्येष्ठांचे फोन नंबर या ठगाकडे कसे येतात यावर ही आश्‍चर्य आणि शंका व्यक्‍त केली जात आहे.

फसवणुकीसाठी करण्यात येत असलेले हे कॉल प्रामुख्याने महिला अधिक करत आहेत. या महिलाही त्यांच्या बोलण्यावरुन उच्चशिक्षित असल्याचे जाणवते. अत्यंत अस्खलित हिंदी आणि इंग्रजीमध्ये या महिला संवाद साधतात. सरकारी आणि खाजगी क्षेत्राच्या प्रत्येक विभागाची त्यांना माहिती असते, तसेच पेन्शन आणि प्रॉव्हिडंड फंडाबद्दल ही त्यांना माहिती असते. भाषा प्रभुत्व आणि माहितीच्या आधारावर या अगदी सहजपणे गंडा घालतात.
अशा प्रकारचे कॉल सध्या प्राधिकरण परिसरात खूप अधिक येत असल्याचे सांगितले जात आहे. पूर्वी नोकरदार वर्गाने शहरापासून दूर अशा प्राधिकरण भागात स्वस्त जमीन व घरे मिळाल्याने येथे घरे घेतली. या भागात मोठ्या संख्येने सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरीक राहत आहेत. या परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये फोन कॉल्स वाढले आहेत. काही ज्येष्ठ नागरीक या जाळ्यात फसण्याची शक्‍यता आहे. सेवानिवृत्तीच्या काळात आपल्या गाठीशी मोठी रक्‍कम असावी, या आशेने काही ज्येष्ठ नागरीक आपल्या नातेवाईकांना न सांगता गुपचूप ही रक्‍कम मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे ही सांगण्यात येत आहे.

ही शुद्ध फसवणूक
पोलीस विभागाकडून अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे वारंवार सांगितले जाते. एवढेच नव्हे तर ज्या पेन्शन फंड रेग्युलेटरी ऍण्ड डेव्हलपमेंट ऍथरिटी दिल्लीच्या नावाने फसवणूक होत आहे त्या विभागाने देखील आपल्या संकेतस्थळावर ही शुद्ध फसवणूक असल्याचे स्पष्ट केले आहे. पीएफआरडीए च्या संकेत स्थळावर दर्शनी ठिकाणीच ही सूचना प्रकाशित करण्यात आली आहे की, सदर विभागाकडून अशा प्रकारचे कॉल, मॅसेज केले जात नाहीत. अशा प्रकारच्या कॉल्सवर विश्‍वास ठेवू नये. या नोटीसच्या पीडीएफमध्ये तर कशा प्रकारे फसवणूक केली जाते याचे स्पष्ट वर्णन केले आहे आणि या ठगाकडून मागितल्या जाणाऱ्या 29 हजार 999 रुपये या रक्‍कमेचा उल्लेख केला जात आहे. सावधानतेचा इशारा देत असे फोन कॉल्स आल्यास त्यांचे नंबर, ई-मेल आयडी, पत्ता पोलिसांना द्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.

असे विणले जाते जाळे
“फ्रॉड गॅंग’ “कॉल’व्दारे ज्येष्ठांना त्यांच्या नोकरीची वर्षे आणि सेवानिवृत्तीचे वर्ष सांगत असताना आपले “कंबाइड प्रोव्हिडंड फंडा’च्या रुपात अथवा पेन्शन फंड रुपात पैसे कसे जमा झाले आहेत याबाबत माहिती देतात. यासाठी “ऑनलाइन साइट्‌स’चे नाव सांगून अगदी संबंधित व्यक्‍तीचा फाईल नंबर आणि पासवर्डही देतात. तसेच वारंवार बजावून सांगतात फाईल नंबर आणि पासवर्ड कोणालाही सांगू नका. बहुतेक जणांना तीन ते साडे तीन लाखांपर्यंतची रक्‍कम तुमच्या नावे जमा असल्याचे सांगितले जाते. “सेल्फ अटेस्टेड डाक्‍युमेंट्‌स’ पाठवायला सांगितले जातात. त्यात पॅन कार्ड, आधार कार्ड, दोन रंगीत फोटो व एक “कॅन्सल चेक’ अशी कागदपत्रे मागवली जातात. 30 एप्रिल पूर्वी सर्व कागदपत्रे जमा करण्यास सांगितले जाते. एवढे जाळे विणल्यानंतर ज्येष्ठ नागरीक त्यात अडकतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)