पॅरिस – युकी भांब्री आणि दिविज शरण या भारतीय युवा खेळाडूंच्या जोडीने संघर्षपूर्ण विजयाची नोंद करताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. यंदा झालेल्या पहिल्यावहिल्या महाराष्ट्र ओपन स्पर्धेत पहिल्यांदाच एकत्र आलेल्या युकी-दिविज जोडीने फॅब्रिस मार्टिन आणि पूरव राजा या जोडीचा कडवा प्रतिकार 6-3, 5-7, 6-4 असा कडव्या झुंजीनंतर संपुष्टात आणताना विजयी सलामी दिली. युकी-दिविज जोडीसमोर दुसऱ्या फेरीत ऑलिव्हर माराच व मेट पेव्हिक या द्वितीय मानांकित जोडीचे कडवे आव्हान आहे.

पुरुष दुहेरीत सहभागी होत असलेला आणखी एक भारतीय खेळाडू रोहन बोपण्णाने फ्रान्सचा अव्वल दुहेरी खेळाडू एदुआर्द रॉजर व्हॅसेलिनच्या साथीत स्पर्धेत भाग घेतला आहे. बोपण्णा-व्हॅसेलिन जोडीला या स्पर्धेत 13वे मानांकन देण्यात आले असून त्यांच्यासमोर सलामीच्या पेरीत बेन्जामिन बोन्झी आणि ग्रेगोर जॅक या स्थानिक जोडीचे आव्हान आहे. त्याआधी युकी भांब्रीचे पुरुष एकेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. बेल्जियमच्या रुबेन बेमेलमन्सने युकीचा प्रतिकार 6-4, 6-4, 6-1 असा मोडून काढताना दुसरी फेरी गाठली. भारताची स्टार महिला खेळाडू सानिया मिर्झा गर्भवती असल्यामुळे यंदाच्या स्पर्धेत सहभागी झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)