फ्रान्समध्येही होणार राफेल कराराची चौकशी? 

“शेरपा’ एनजीओकडून तक्रार दाखल 

नवी दिल्ली: राफेल करारावरुन नरेंद्र मोदी सरकारच्या अडचणी वाढलेल्या असताना आता भारताप्रमाणे फ्रान्समध्येही राफेल करारावरून वातावरण तापत आहे. फ्रान्समधील भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने फ्रान्सच्या राष्ट्रीय आर्थिक अभियोजक कार्यालयात राफेल कराराविरोधात तक्रार दाखल केली आहे. या संस्थेने भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या राफेल कराराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शेरपा या एनजीओने ही तक्रार दाखल केली आहे. बेकायदा आर्थिक स्त्रोत, भ्रष्टाचार, कर चुकवेगिरी, एकूणच आर्थिक गुन्ह्यांविरोधात आपण लढा देतो, असा या संस्थेचा दावा आहे. याबाबतची माहिती फ्रान्सच्या मीडियापार्ट संकेतस्थळावरून देण्यात आली आहे. फ्रान्सच्या राष्ट्रीय आर्थिक अभियोजक कार्यालयात ऑक्‍टोंबर अखेरीस ही तक्रार दाखल करण्यात आली.

भारत आणि फ्रान्समध्ये कुठल्या नियमांच्या आधारावर 36 राफेल विमानांच्या विक्रीचा करार झाला तसेच दास्सू कंपनीने ऑफसेट भागीदार म्हणून अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपची निवड कशी केली? त्याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी शेरपाने केली आहे. अनिल अंबानींच्या कंपनीकडे फायटर विमानांच्या निर्मितीचा कुठलाही अनुभव नाही. तसेच हा करार होण्याच्या 12 दिवस आधी ही कंपनी स्थापन झाली आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे मीडिया पार्टने म्हटले आहे.

शेरपाचे संस्थापक विलियम बोयुरडॉन म्हणाले, हा करार हे सर्व गंभीर प्रकरण असल्याचे संकेत देत आहे. मात्र, अभियोजक कार्यालयाकडून चौकशी सुरु झाली आहे किंवा नाही ते समजू शकलेले नाही. भारतातही राफेल करारात गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत असून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)