फोर्ब्सच्या “ग्लोबल गेम चेंजर्स’मध्ये मुकेश अंबानी अव्वल

न्यूयॉर्क – रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या “ग्लोबल गेम चेंजर्स’च्या यादीमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. उद्योगामध्ये प्रचंड वाढ करणे आणि जगभरातील अब्जावधी लोकांच्या जीवनमानामध्ये परिवर्तन घडवून आणणारे म्हणून अंबानी यांचे नाव या यादीमध्ये अग्रस्थानी निवडण्यात आले आहे. फोर्ब्सच्या “ग्लोबल गेम चेंजर्स’च्या दुसऱ्या यादीमध्ये 25 धडाडीच्या उद्योजकांचा समावेश आहे. हे असे उद्योजक आहेत, जे सध्याच्या स्थितीबाबत असमाधानी आहेत आणि उद्योगातील प्रचंड बदलाद्वारे जगभरातील अब्जावधींच्या जीवनमानामध्ये ज्यांनी सुधारणा घडवून आणली आहे. भारतातील जनतेपर्यंत इंटरनेट पोहोचवण्याच्या प्रयत्नांबद्दल अंबानी यांचा “ग्लोबल गेम चेंजर’ म्हणून अव्वल क्रमांक लागतो.
अंबानी हे तेल आणि गॅस उद्योगातील बडे प्रस्थ आहे. काही वर्षांपूर्वीच रिलायन्सने टेलिकॉम उद्योगात मोठ्या धडाक्‍यात पदार्पण केले. आता अत्यल्प किंमतीत नागरिकांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यायला रिलायन्स आघाडीवर आहे. सहा महिन्यांमध्ये रिलायन्सने 100 दशलक्ष ग्राहक मिळवले आणि बाजारात एकत्रीकरणाची एक लाट निर्माण केली, असे फोर्ब्सने म्हटले आहे. रिलायन्स जिओ या मोबाईल नेटवर्क ऑपरेटरच्या संदर्भात फोर्ब्सने हे निरीक्षण नोंदवले आहे.
फोर्ब्सच्या “ग्लोबल गेम चेंजर्स’च्या यादीमध्ये डायसन कंपनीचे संस्थापक जेम्स डायसन, ब्लॅकरॉक या इन्व्हेस्टमेंट कंपनीचे सहसंस्थापक लॅरी फिंक, सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान, स्नॅप या सोशल मिडीया कंपनीचे सहसम्स्थापक इव्हान स्पिजेल आदींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)