नवी दिल्ली – केंद्र सरकारने डेटा लिक प्रकरणी दुसऱ्यांदा फेसबुक आणि केंब्रिज ऍनालिटीका या कंपन्यांना नोटिसा बजावल्या. याआधीच्या नोटिसांना संबंधित कंपन्यांनी दिलेल्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सोशल नेटवर्किंगमधील आघाडीची अमेरिकी कंपनी फेसबुकचा युजर्स डेटा लिक झाल्याच्या प्रकरणाने जगभरात खळबळ उडवून दिली. भारतातील फेसबुक युजर्सही त्यामुळे प्रभावित झाल्याची माहिती पुढे आली. या लिक प्रकरणाच्या केंद्रस्थानी केंब्रिज ऍनालिटीका ही ब्रिटनस्थित कंपनी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सरकारने दोन्ही कंपन्यांना नोटिसा बजावल्या.
मात्र, त्या कंपन्यांनी दिलेल्या उत्तरांमुळे समाधान न झाल्याने त्यांना पुन्हा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून 10 मेपर्यंत अतिरिक्त प्रश्नांची उत्तरे मागवण्यात आली आहेत. केंब्रिज ऍनालिटीकाने पहिल्या नोटिसीला दिलेले उत्तर टाळाटाळ करणारे असल्याचे म्हणत सरकारने त्या कंपनीला आणखी पाच प्रश्न विचारले आहेत. भारतातील कुठल्या स्वरूपाचा डेटा गोळा करण्यात आला, असे ऍनालिटीकाला विचारण्यात आले आहे. डेटा लिक प्रकरणात भारतातील 5 लाख 62 हजार युजर्स प्रभावित झाल्याची कबुली फेसबुककडून याआधीच देण्यात आली. तर भारतीय नागरिकांचा कुठला फेसबुक डेटा आपल्याकडे नसल्याचा दावा ऍनालिटीकाकडून करण्यात आला होता.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा