फेसबुकवरील आभासी सुंदरीच्या प्रेमाचा विळखा

अनेकांना लाखोंचा गंडा : उच्च शिक्षीत, उच्च पदस्थ, ज्येष्ठही फेसबुक फ्रेंडचे बळी

 – संजय कडू

पुणे – फेसबुकच्या माध्यमातून अनेक आभासी मित्र-मैत्रीणी जोडले जातात. यातील काहींचे अस्तित्व हे प्रत्यक्षात प्रोफाईल प्रमाणे नसते. एखाद्या सुंदर तरुणीचे किंवा महिलेचे प्रोफाईल बनवून प्रत्यक्षात मात्र चॅट करणारा एखादा पुरुषही असू शकतो. मात्र, आभासी मैत्रीणीच्या प्रेमात पडलेल्यांना त्याची जाणीवही नसते.

प्रत्यक्षातील मित्राला गरजेला हजार रुपयांचीही मदत न करणारे मात्र आभासी मैत्रीणीसाठी काही लाखो रुपये ऑनलाइन पद्धतीने वर्ग करण्यास तयार होतात. याप्रकारे अगदी 30 ते 80 लाखांपर्यंतचा गंडा पडलेली अनेक उदाहरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये उच्च शिक्षीत, उच्च पदस्थ आणि ज्येष्ठ नागरिकही आभासी फेसबूक फ्रेंडचे बळी पडले आहेत. यातील काहींना तर बॅंकेतील सर्व रक्‍कम इतकेच नव्हे तर मुदत ठेवी मोडूनही ऑनलाइन पैसे वर्ग केले आहेत.

मागील काही वर्षांत फसवणूक करण्याची ही नवी मोडत चर्चेत आली आहे. याप्रकारे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. यासंदर्भात अनेक माध्यमांत छापूनही आले आहे. तर, दुसरीकडे सायबर क्राईम सेलकडून अनेकदा जनजागृतीही झाली आहे. मात्र, तरीही शिकले सवरलेले फेसबुक फ्रेंडवर नको तितका विश्‍वास ठेऊन आयुष्य भराची कमाई गभावून बसले आहेत. याप्रकारे फसवणूक करणारे अनेकदा परदेशात बसलेले असतात. त्यामुळे त्यांना जेरबंद करणे आणि रक्‍कम रिकव्हर करणे जवळपास अशक्‍यच असते.

….अशी आहे मोडस
फेसबुकवर एखादी परदेशी तरुणी प्रथम फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. त्यानंतर सातत्याने चॅट करून समोरच्या व्यक्तीचा विश्‍वास संपादन करते. विश्‍वास संपादन केल्यानंतर परदेशातून एखादे महागडे गिफ्ट पाठवत असल्याचे सांगण्यात येते. थोड्याच दिवसांत दिल्ली एअरपोर्टवरून कस्टम ऑफीसर बोलत असल्याचे सांगण्यात येते. परदेशातून महागडे गिफ्ट आले असून त्याची कस्टम ड्युटी आणि इतर कर भरण्यासाठी वेगवेगळे बॅंक खाते क्रमांक दिले जातात. सातत्याने वेगवेगळी कारणे सांगत त्यावर पैसे भरण्यास सांगितले जातात. याप्रकारे अगदी एक ते वीस लाख रुपयांपर्यंत पैसे भरून फसवणूक झालेल्या व्यक्ती आहेत. तर दुसऱ्या पद्धतीने फेसबुकवर मैत्री झाल्यावर भारतात जागेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची असल्याचे भासवले जाते. यानंतर परदेशातून भारतात जागा पहाण्यासाठी येत असल्याचे सांगत फ्लाईटच्या तिकीटांची छायाचित्रे व्हॉटस अॅप/फेसबुकवर पाठवली जातात. दिल्ली एअरपोर्टवरून कस्टम ऑफिसरचा फोन येतो. तुमच्या मित्राला एअरपोर्टवर पकडण्यात आले असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात परदेशी चलन आणि महागड्या भेटवस्तू असल्याचे सांगण्यात येते. त्या सोडवण्यासाठी वेगवगेळ्या प्रकारचे कर तसेच संबंधिताला दिल्ली एअरपोर्टवरून पुण्यात येण्यासाठी विमानाचे तिकीट यासाठी पैशांची ऑनलाइन पद्धतीने मागणी करण्यात येते. याप्रकारेही अनेकांची लाखोंची फसवणूक झाली आहे. एका खासगी कंपनीतील अधिकाऱ्याने तर जवळपास 80 लाख रुपये याप्रकारे गमावले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
21 :thumbsup:
4 :heart:
53 :joy:
23 :heart_eyes:
2 :blush:
5 :cry:
5 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)