फेडरल फ्रंटची गुंतागुंत कशी सुटणार?

      चर्चा

  प्रा. अविनाश कोल्हे

आज भाजपाविरोधी शक्‍ती एका आवाजात बोलत नाहीत. पण लवकरच त्यांना काही तरी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. वर्षभराच्या आत पुढच्या लोकसभा निवडणुका होणार आहेत. आतापासून जागावाटपाची चर्चा सुरू करावी लागेल. उत्तर प्रदेश/ बिहारमधील चार-दोन मतदारसंघापुरते एकत्र येणे वेगळे आणि भारतभर पसरलेल्या 550 मतदारसंघाच्या संदर्भात एकत्र येणे वेगळे आहे. अशा स्थितीत “तिसरी आघाडी’ की “फेडरल फ्रंट’ हा प्रश्‍न उरतोच.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुजरात विधानसभा निवडणुका, त्यानंतर उत्तर प्रदेश व बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकांत विरोधी पक्षांना चांगले यश मिळाल्यामुळे सन 2019 मध्ये भाजपाला घेरता येईल असा विश्‍वास विरोधी पक्षांत निर्माण झालेला आहे. भाजपाला हरवायचे असेल तर भाजपाविरोधी मतांत फूट पडू देता कामा नये याचा अंदाज आल्यामुळे विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

एका बाजूने राहुल व सोनिया गांधी कॉंग्रेसप्रणीत संयुक्‍त पुरोगामी आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सोनिया गांधींनी विरोधी पक्षनेत्यांना खाना दिला होता. मात्र, या प्रयत्नांना एक अंगभूत मर्यादा आहे; ज्यामुळे संपुआ फार मोठी प्रगती करू शकेल असे आज तरी वाटत नाही. ही मर्यादा नीट समजून घेतली पाहिजे. ही मर्यादा म्हणजे भारतीय संघराज्यातील अनेक राज्यांत कॉंग्रेस पक्ष एकेकाळी सशक्‍त होता व सत्ताधारीसुद्धा होता. आज कार्यरत असलेले जवळजवळ सर्व प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसच्या विरोधात बंड करून अस्तित्वात आलेले पक्ष आहेत. तामिळनाडूतील द्रमुक असो की मुंबईतील शिवसेना; या सर्वांना कॉंग्रेसचे राजकारण मान्य नव्हते; म्हणूनच तर त्यांनी आपापल्या राज्यांत प्रादेशिक पक्ष स्थापन केले.

आता अशा राज्यांतील प्रादेशिक पक्ष कॉंग्रेससह समझोता करण्यास कितपत तयार होतील, याबद्दल शंका आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेश. एके काळी महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेशसुद्धा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मार्च 1982 मध्ये एन.टी. रामाराव यांनी “तेलुगू अस्मिता’ हा मुद्दा पुढे करून ‘तेलुगू देसम पक्ष’ स्थापन केला. पुढे केवळ नऊ महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणूक तेलुगू देसमने कॉंग्रेसचा दारुण पराभव करत सत्ता हस्तगत केली. एवढेच नव्हे तर सन 1984 च्या लोकसभेत तेलुगू देसमसारखा एक प्रादेशिक पक्ष सर्वात जास्त खासदार असलेला पक्ष ठरला. त्यानंतर तेलुगू देसम व कॉंग्रेस यांच्यात आंध्र प्रदेशातील सत्तेबद्दल लपंडाव सुरू झाला. तेथे कधी तेलुगू देसम सत्तेत असे; तर कधी कॉंग्रेस. आजही आंध्र प्रदेशात तेलुगू देसम सत्तेत आहे. थोडक्‍यात, म्हणजे तेलुगू देसमसारखा पक्ष कॉंग्रेसच्या विरोधात राजकारण करून निर्माण झाला. अशा पक्षांची जवळजवळ सर्व हयात कॉंग्रेसच्या विरोधात लढण्यात गेली. आता हे सर्व रातोरात विसरून कॉंग्रेसप्रणीत संपुआत सामील होणे त्यांच्यासाठी तसे कठीणच आहे.

तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी “बिगर भाजपा-बिगर कॉंग्रेस’ शक्‍तींची “फेडरल फ्रंट’ काढण्याची तयारी सुरू केली आहे. अशीच भूमिका मार्क्‍सवादी कम्युुनिस्ट पक्षाची आहे. पण माकपचे पश्‍चिम बंगालमध्ये बॅनर्जींशी उभे वैर आहे. परिणामी माकप या फेडरल फ्रंटमध्ये येणार नाही, हे तर स्पष्ट आहे. ममता बॅनर्जींची अपेक्षा होती की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार “फेडरल फ्रंट’मध्ये सहभागी होतील. पण पवारांनी “भाजपाच्या विरोधात सर्व प्रादेशिक पक्षांनी एकाच आघाडीतून लढावे,’ असे आवाहन केल्यामुळे पवार “फेडरल फ्रंट’मध्ये जाणार नाहीत, असे आज तरी वाटते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तारिक अन्वर यांच्या मते, आगामी लोकसभा निवडणुकांत “तिसरी आघाडी’ किंवा “फेडरल फ्रंट’ला वाव नसावा. म्हणजेच, राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपाविरोधी मतांत फूट पडू नये, असे वाटते.

असे असले तरी ममता बॅनर्जींनी फेडरल फ्रंटचे स्वप्न सोडलेले नाही. नुकतेच ममता बॅनर्जी व के. चंद्रशेखर राव यांची कोलकोता येथे भेट झाली होती. यातही असे दिसून येते की के. चंद्रशेखर राव यांना “फेडरल फ्रंट’ म्हणजे ‘बिगर भाजपा व बिगर कॉंग्रेस’ शक्‍तींचे एक व्यासपीठ, असे वाटते तर ममता बॅनर्जींनी, कॉंग्रेसला पूर्णपणे बाहेर ठेवणे योग्य होईल का, याबद्दल ठाम निर्णय घेतलेला नाही.

या संदर्भात के. चंद्रशेखर राव व माकप यांची राजकीय भूमिका सारखीच आहे. या दोघांच्या मते आर्थिक धोरणांचा विचार केला तर भाजपा व कॉंग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या अर्थकारणात काडीचा फरक नाही. पी. व्ही. नरसिंहराव यांनी 1991 साली नवे आर्थिक धोरण लागू करत आर्थिक सुधारणांचा पहिला टप्पा राबवला तर वाजपेयी सरकारने 1998 साली आर्थिक सुधारणांचा दुसरा टप्पा तितक्‍याच उत्साहात राबवला. नेमका यालाच माकप व के. चंद्रशेखर यांचा विरोध आहे.

कॉंग्रेसप्रणीत संपुआ सन 2004 ते 2009 व सन 2009 ते 2014 दरम्यान सत्तेत होती. माकपच्या मते, संयुक्‍त पुरोगामी आघाडीचा “तिसरा अवतार’ आता शक्‍य होणार नाही. कॉंग्रेसबरोबर युती करायची की नाही, याबद्दल माकपमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. माकपचे पॉलिट ब्युरोचे प्रमुख सीताराम येचुरींच्या मते, कॉंग्रेसशी युती करून भाजपासारख्या जातीयवादी शक्‍तींचा पराभव केला पाहिजे; तर प्रकाश करत यांच्या मते भाजपा व कॉंग्रेस यांच्यात काहीही फरक नसल्याने, माकपने दोघांशी संघर्ष केला पाहिजे. माकपाची भूमिका अजून अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाही. पुढच्या महिन्यांत माकपचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे ज्यात या भूमिकेवर अंतिम निर्णय होईल.

माकपाला तर के. चंद्रशेखर राव पुढे करतात, ती “फेडरल फ्रंट’सुद्धा मान्य नाही. माकपच्या मते, प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. अशा स्थितीत बिगर भाजपा व बिगर कॉंग्रेस पक्षांनी व्यवस्थित तयारी करून जर निवडणुका लढवल्या तर भाजपाला सन 2019 ची लोकसभा निवडणुका जड जाईल. पण हे प्रत्यक्षात कसे करायचे, याबद्दल माकप सध्या काही बोलत नाही. या संदर्भात डॉ. राममनोहर लोहिया यांनी पुढाकार घेऊन 1960 च्या दशकात पुढे आणलेला “बिगर कॉंग्रेसवाद’ आठवतो. तेव्हा त्यांनी म्हटले होते की, प्रत्येक मतदारसंघात कॉंग्रेससमोर विरोधी पक्षांतर्फे एकच उमेदवार उभा करायचा. याद्वारे कॉंग्रेसविरोधी मतांतील फूट टाळता येईल. माकपला असे काही अभिप्रेत आहे का?

नुकत्याच उत्तर प्रदेशात झालेल्या दोन पोटनिवडणुकांत बसपा-सपा एकत्र आले. तसेच ते उत्तर प्रदेशातील एकूण 80 लोकसभा जागांबद्दलही एकत्र येतील का, हा खरा प्रश्‍न आहे. हा प्रश्‍न यासाठी उपस्थित होतो की, गोरखपूर व फूलपूर या दोन लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मायावतींचा पक्ष उमेदवार देणारच नव्हता. मायावतींची भूमिकाच पोटनिवडणुका न लढवण्याची आहे. परिणामी त्यांना या दोन पोटनिवडणुकांत सपाला पाठिंबा देण्यात काही अडचण नव्हती. पण जेव्हा 2019 च्या निवडणुका येतील तेव्हा बसपा-सपा यांच्यात जागावाटप सुरळीत होईल का? ते व्हावे अशी जरी इच्छा असली, तरी ते प्रत्यक्षात होणे तसे अवघडच आहे. आपल्या देशातील राजकारण एवढ्या गुंतागुंतीचे आहे की कशाबद्दल काही ठोस विधान करता येत नाही. तरीही 2019 ची लोकसभा निवडणूक भाजपाला जड जाईल इतपत विरोधी पक्षांची एकी झालेली असेल, असे विधान करायला जागा नक्कीच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)