फेडरर “हिरवळीचा राजा’

आठ वेळा विजेतेपद जिंकत रचला इतिहास
– मेरिन सिलिचचा सरळ सेटमध्ये पराभव

लंडन – विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने आज आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत हिरवळीवरचा राजा असल्याचे सिद्ध केले. क्रोएशियाच्या मेरिन सिलिचवर सरळ सेटमध्ये मात करत फेडररने विक्रमी आठव्यांदा विम्बल्डनच्या विजेतेपदाला गवसणी घातली. त्याबरोबरच आठ वेळा विम्बल्डनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला टेनिसपटू ठरला आहे.

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात फेडररने क्रोएशियाच्या सातवा मानांकित मेरिन सिलीचचा 6-3, 6-1, 6-4 अशी मात केली. 35 वर्षीय फेडररने 19वे ग्रॅंड स्लॅम पटकावित विश्‍वविक्रम नोंदविला. या विजयासह आठव्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद जिंकत त्याने विल्यम रेनेशॉ आणि पीट सॅम्प्रस (प्रत्येकी सात वेळा) यांना मागे टाकले. तसेच विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा तो वयस्कर खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1976मध्ये ऍथर ऍश यांनी वयाच्या 32व्या वर्षी विजेतेपद जिंकले होते.

विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच दाखल झालेल्या सातव्या मानांकित मेरिन सिलीचला पराभूत करण्यासाठी फेडररला जास्त परिश्रम घ्यावे लागले नाही. तिसऱ्या मानांकित फेडरने हा सामना 1 तास 41 मिनीटांत जिंकला. पहिला गेम जिंकत सिलिचने चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर फेडररच्या आव्हानासमोर त्याची टिकाव लागलाच नाही.

पहिल्या सेटमध्ये 6-3 ने बाजी मारल्यानंतर फेडररने सिलिचसाठी पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही.दुसऱ्या सेटमध्ये सिलिच फेडररच्या आक्रमणापुढे पूर्णपणे निष्प्रभ झालेला दिसला. त्याचा फायदा उठवत फेडररने हा सेट 6-1 अशा फरकाने खिशात घातला. त्यानंतर तिसरा सेट 6-4 ने जिंकून फेडररने सामन्यासह विम्बल्डनच्या आठव्या विजेतेपदावर अगदी दिमाखात कब्जा केला.

तत्पूर्वी उपांत्य फेरीत 35 वर्षीय फेडररने झेक प्रजासत्ताच्या 31 वर्षीय थॉमस बर्डिचचे कडवे आव्हान 7-6, 7-6, 6-4 असे परतवले होते. तर पहिल्यांदाच विम्बल्डनची अंतिम सिलिचने गाठताना अमेरिकेच्या सॅम क्‍युरे याला नमवले होते. दोन तास 56 मिनिटांपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात सिलिचने क्‍युरेला 7-6, 4-6, 7-6, 7-5 असे पराभूत केले. दरम्यान, मरे, नदाल आणि जोकोव्हिच यांना उपांत्यपूर्व फेरीचा अडथळाही पार करू शकले नाही.

फेडररचे 19 ग्रॅड स्लॅम
विम्बल्डन – 8, ऑस्ट्रेलियन ओपन – 5, यूएस ओपन -5, फ्रेंच ओपन -1

ऑल टाइम : ग्रॅड स्लॅम (सिंगल्स टायटल)
रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड) – 19
राफेल नदाल (स्पेन) – 15
पीट सॅम्प्रस (अमेरिका)-14
रॉय इमर्सन (ऑस्ट्रेलिया)-12
नोवाक जोकोव्हिच (सर्बिया)-12

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)