फेडरर हा तर “एजलेस वंडर’; महान टेनिसपटू रॉड लेव्हर यांचे प्रशंसोद्‌गार

मेलबर्न – रॉजर फेडररच्या वयाला कसलेच बंधन नसून तो एका दशकापूर्वी खेळत होता, त्याच दर्जाचे टेनिस खेळत आहे. किंबहुना फेडररला “एजलेस वंडर’ हे एकच विशेषण शोभेल, असे प्रशंसोद्‌गार ऑस्ट्रेलियाचे महान टेनिसपटू रॉड लेव्हर यांनी काढले आहेत. फेडररने काल मेरिन सिलिचला पाच सेटमध्ये पराभूत करून सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली.

आपल्या देदीप्यमान कारकिर्दीतील फेडररचे हे 20वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले. नजीकचा प्रतिस्पर्धी राफेल नदालपेक्षा फेडरर 4 विजेतेपदांनी पुढे असून एका वर्षाच्या अवधीत त्याने तिसरा ग्रॅंड स्लॅम मुकुट जिंकला आहे. सुमारे चार दशकांपूर्वी 11 ग्रॅंड स्लॅम जिंकतानाच गोल्डन स्लॅम पटकावणाऱ्या रॉड लेव्हर यांनी फेडररच्या प्रत्येक सामन्याला हजेरी लावली आणि त्याच्या खेळाचे बारकाईने निरीक्षण केले आहे.

-Ads-

तसेच फेडररने नेहमीच लेव्हर आपले आदर्श असल्याचे नमूद केले आहे. फेडररचे बहुतांश प्रमुख प्रतिस्पर्धी दुखापतींनी ग्रस्त असताना वयाच्या 36व्या वर्षीही फेडररची तंदुरुस्ती अफलातून असून त्याला कोणत्याही मोठ्या दुखापतीने सतावलेले नाही. त्याच्या खेळातील कौशल्य आणि कोर्टवरील फेडररचे पदलालित्य, तसेच कोर्टनुसार खेळाच्या तंत्रात बदल करण्याची क्षमता कायम असून जगभरातील खेळाडूंच्या तो खूपच पुढे आहे, असे लेव्हर यांनी सांगितले.

फेडरर त्याच्या सर्वोत्तम खेळापेक्षा सरस कामगिरी करीत आहे असे मी म्हणणार नाही. परंतु बऱ्याच वेळा तो आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जवळपास येतो आहे, असे सांगून लेव्हर म्हणाले की, सुमारे दशकभरापूर्वीचा फेडरर मला आता आठवतो आहे. त्या वेळी त्याने 2005 विम्बल्डनपासून 2010 ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यानच्या काळातील 19पैकी 18 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. फेडररची शारीरिक क्षमता साहजिकच कमी झाली असली, तरी त्या वेळेपेक्षा तो आता “स्मार्ट टेनिस’ खेळत आहे.

अन्य खेळाडू आणि फेडरर यांच्यातील फरक सागताना लेव्हर म्हणाले की, प्रतिस्पर्ध्यांच्या खेळातील जे दोष तुम्हा-आम्हाला दिसत नाहीत ते फेडरर अचूक हेरतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून प्रतिस्पर्धी खेळाडूला नामोहरम करतो. “डाऊन द लाईन बॅकहॅंड विनर’ लगावण्याची आपली क्षमता कायम असल्याचा आत्मविश्‍वास वाटत आहे, तोपर्यंत फेडरर खेळत राहील. तसेच फेडररचे टेनिसवरील अतीव प्रेम, स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी आणि काळाबरोबर बदलण्याची त्याची क्षमता या गुणांमुळे फेडरर इतक्‍यात निवृत्त होण्याची कसलीही चिन्हे नसल्याचा निर्वाळाही लेव्हर यांनी दिला. मुख्य म्हणजे तो पूर्वी कधीही नव्हता इतका खेळाचा आनंद लुटत असून हेच त्याच्या यशाचे गमक असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)