फेडरर, नदालमुळेच घडलो- जोकोविच

नवी दिल्ली: एकेकाळचा विश्‍वविक्रमवीर आणि अमेरिकेचा महान खेळाडू पीट सॅम्प्रसच्या 14 ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाशी बरोबरी साधल्यामुळे नोव्हाक जोकोविच भलताच आनंदात आहे. अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना जोकोविचने हा मान मिळविला. आता केवळ रॉजर फेडरर (20 ग्रॅंड स्लॅम मुकुट) आणि राफेल नदाल (17 ग्रॅंड स्लॅम मुकुट) हे दोघेच त्याच्या पुढे आहेत.

परंतु सार्वकालिक यादीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्यावरही जोकोविचचे पाय जमिनीवरच आहेत. फेडरर आणि नदाल यांसारख्या महान खेळाडूच्या काळात खेळायला मिळाल्याबद्दल त्याने नियतीचे आभार मानले आहेत. इतकेच नव्हे तर फेडरर आणि नदाल यांच्यामुळेच एक खेळाडू म्हणून आपुली जडणघडण झाली, असे त्याने विजेतेपदानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. तसेच या दोघांमुळे आज टेनिसचा दर्जा कायम असल्याचे उद्‌गारही जोकोविचने काढले आहेत.

अमेरिकन ओपनमधील विजेतेपदामुळे जोकोविच पुन्हा एकदा विश्‍वक्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे. गेल्या दीड वर्षांत कोपराच्या दुखापतीने सतावल्यामुळे त्याची विश्‍वक्रमवारीत घसरण झाली होती. तसेच एकही प्रमुख स्पर्धा जिंकता आली नसल्यामुळे जोकोविचचा आत्मविश्‍वासही ढासळला होता. परंतु यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत विजेतेपद पटकावताना त्याचा आत्मविश्‍वास परतल्याने दिसून आले. पाठोपाठ बरीच वर्षे प्रतीक्षा असलेल्या सिनसिनाटी मास्टर्सचे विजेतेपद आणि आता अमेरिकन ओपनचा मुकुट अशी घोडदौड करीत जोकोविचने पुन्हा एकदा फेडरर व नदालसह “टॉप थ्री’मध्ये स्थान मिळविले आहे.

सुमारे 10 वर्षांपूर्वी फेडरर व नदालसारख्या खेळाडूंसोबत टेनिसविश्‍वात राहताना मला आनंद होत नव्हता. अशा प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आपला कसा टिकाव लागणार असे मला वाटायचे. परंतु आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहताना त्यांच्यामुळेच मी हा टप्पा गाठला असल्याची मला जाणीव होत आहे, असे सांगून जोकोविच म्हणाला की, मला येथपर्यंत आणून ठेवल्याबद्दल मी फेडरर आणि नदाल यांचा खरोखरीच ऋणी आहे. या दोघांशिवाय टेनिसविश्‍वाची मी कल्पनाही करू शकत नाही.

सॅम्प्रस हा बालपणापासून आदर्श

पीट सॅम्प्रस हा बालपणापासूनच आपला आदर्श असल्याचे सांगून जोकोविच म्हणाला की, मला आठवते त्यानुसार लहानपणी टेलिव्हिजनवर मी पाहिलेला टेनिसचा पहिला सामना पीट सॅम्प्रसचे विम्बल्डनमधील विजेतेपद हाच होता. त्याचा खेळ पाहूनच मला टेनिसमद्ये काहीतरी करून दाखविण्याची प्रेरणा मिळाली. आज मागे वळून पाहताना सॅम्प्रस आणि माझ्या टेनिसमधील वाटचालीत मला खूपच साम्य आढळून येते. त्यानेही अशाच प्रकारे अनेक अडथळ्यांवर मात करीत 14 ग्रॅंड स्लॅम मुकुटांचा विक्रम रचला होता. सॅम्प्रसच्या 14 मुकुटांच्या कामगिरीशी बरोबरी साधल्यामुळे मला आणखी पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे. मी आकड्यांच्या बाषेत बोलणार नाही. परंतु मला आणखी अनेक ग्रॅंड स्लॅम मुकुट जिंकायचे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)