फेडररला विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद

एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धा
देशबांधव स्टॅनिस्लास वॉवरिन्कावर सरळ सेटमध्ये मात
इंडियन वेल्स, दि. 20 – स्वित्झर्लंडचा विश्‍वविक्रमवीर ग्रॅंड स्लॅम विजेता रॉजर फेडररने आपलाच देशबांधव स्टॅनिस्लास वॉवरिन्कावर सरळ सेटमध्ये मात करताना येथे पार पडलेल्या एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या विजेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे फेडररचे या स्पर्धेतील हे पाचवे विजेतेपद ठरले. या कामगिरीमुळे फेडररने नोव्हाक जोकोविचच्या पाच वेळा इंडियन वेल्स स्पर्धा जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात दुखापतीमुळे सुमारे सहा महिने स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहावे लागलेल्या फेडररने या वर्षाच्या प्रारंभी जोरदार पुनरागमन करताना मोसमातील पहिल्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत- ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजेतेपद पटकावून जोरदार पुनरागमन केले होते. तसेच या विजेतेपदामुळे त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना इशाराही दिला होता. त्या यशाचीच पुनरावृत्ती करताना फेडररने एकतर्फी ठरलेल्या अंतिम लढतीत स्वित्झर्लंडच्याच स्टॅनिस्लास वॉवरिन्काचा 6-4, 7-5 असा सहज पराभव करीत विजेतेपदावर शिक्‍कामोर्तब केले.
फेडररने याआधी 2004, 2005, 2006 आणि मग 2012 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. वयाच्या 35व्या वर्षी ही स्पर्धा जिंकणारा फेडरर मास्टर्स स्पर्धा जिंकणारा सर्वाधिक वयस्कर खेळाडूही बनला आहे. याआधी आंद्रे आगासीने 2004मध्ये सिनसिनाटी स्पर्धा वयाच्या 34व्या वर्षी जिंकताना हा मान मिळविला होता. गेल्या वर्षी दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेणाऱ्या फेडररने सांगितले की गेला संपूर्ण आठवडा माझ्यासाठी स्वप्नवत ठरला आहे.
आजच्या अंतिम सामन्यापूर्वी वॉवरिन्काविरुद्धच्या आकडेवारीत 19 विजय व केवळ 3 पराभव अशी सरस कामगिरी करणाऱ्या फेडररलाच विजयासाठी पसंती देण्यात आली होती आणि त्याने आपल्या पाठीराख्यांना निराश केले नाही. तरीही वॉवरिन्काने पहिल्या सेटमध्ये त्याला जबरदस्त झुंज दिली. इतकेच नव्हे तर या संपूर्ण स्पर्धेत पहिल्यांदाच फेडररची सर्व्हिस भेदण्याचा मानही वॉवरिन्काने मिळविला. परंतु 0-2 अशा पिछाडीवरून सलग तीन गेम जिंकत फेडररने 3-2 अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर वर्चस्व कायम राखत विजयाची पूर्तता केली. चौथ्यांदा मास्टर्स स्पर्देची अंतिम फेरी गाठणाऱ्या वॉवरिन्कासाठी हा पराभव स्वीकारणे सोपे गेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)