फेक न्यूज- एक सायबर अभिशाप (भाग-१)

मागील काही दिवसांत अफवांनी घातलेल्या थैमानामुळे व्हॉट्‌स अॅप, फेसबुक या सोशल मीडिया माध्यमांना जणू गालबोटच लागले आहे. फेक न्यूजच्या पसरण्यामुळे निर्दोष जीव चिरडले जात आहेत. फेक न्यूज हा एक अभिशाप बनून न राहू देता याबाबतीत विविध माध्यमांद्वारे व सोशल मीडिया वेबसाईट्‌सद्वारे सरकारने लागलीच तंत्रज्ञानयुक्त पावले उचलणे गरजेचे झाले आहे. तसेच आपणही कोणत्याही बातमीची शहानिशा केल्याशिवाय ती पुढे कोणालाच पसरविणार नाही व कोणतीही बातमी फेक न्यूज आहे असे आढळल्यास त्या बातमीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मदत करू आणि फेक न्यूज पसरवून सामाजिक व कायद्याचे गुन्हेगार होणार नाही असा संकल्प केला पाहिजे.

फेक न्यूज म्हणजे नेमके काय? जीवितहानी, एखाद्याची बदनामी, किंवा एखाद्याला जीवनातून ठार उठवणे, कौटुंबिक कलह व आयुष्यातील तणाव याचे अलीकडचे कारण बऱ्याचदा फेक न्यूज असल्याचे दिसून येते आणि हे म्हणजे सायबर युगातील मोठे दुर्दैवच ठरले आहे. आज सायबर विश्वामध्ये पोहणाऱ्या कुठल्याही बातमीला आपण संशयित दृष्टीने बघत असतो. याचा अर्थ असा की सायबर विश्वातील लोकांची असलेली निष्ठा कमी होत चालली आहे. मागील काही दिवसांत अफवांनी घातलेल्या थैमानामुळे व्हॉट्‌स अॅप, फेसबुक या सोशल मीडिया माध्यमांना जणू गालबोटच लागले आहे. फेक न्यूजच्या पसरण्यामुळे निर्दोष जीव चिरडले जात आहेत. दुःख याचे वाटते की, व्हॉट्‌स अॅप व फेसबुक यांचेच यूजर्स या फेक न्यूज पसरवत आहेत व यांचेच यूजर्स या फेक न्यूजमुळे आपला जीव गमावत आहेत. यालाच कायद्याच्या भाषेमध्ये “betment’ (गुन्ह्याला प्रोत्साहन देणे) असे म्हणतात. सामान्यपणे गुन्ह्याला प्रोत्साहन देणारी व्यक्तीही गुन्हा करणाऱ्या व्यक्ती इतकीच गुन्हेगार असते.

प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्ट फोन, मोफत डेटा, ग्रुपच्या माध्यमातून एका क्षणात त्याचा प्रसार करण्याचे तंत्र आणि सोशल मीडियावरील प्रत्येक संदेशाला खरे मानण्याची अज्ञानी मानसिकता यामुळे कायदा हातात घेत निष्पापांच्या जीवावर उठणाऱ्या या फेक न्यूजना अटकाव घालणे पोलीस प्रशासनासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. फेक न्यूजच्या शोधात सोशल मीडिया ग्रुप्समध्ये शिरून मागोवा घेण्यासोबतच, येणारी प्रत्येक माहिती गांभीर्याने घेणे, हे जिल्हा आणि शहर पोलीस तसेच राज्यातील सायबर सेल्स यांची जबाबदारी बनली आहे. त्यासाठी लोकांची मराठीमधून जनजागृती आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यावर राज्याच्या सायबर विभागाचा भर असणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

फेक न्यूज- एक सायबर अभिशाप (भाग-२)

सोशल मीडिया कंपन्या आणि प्रशासन यांचे एकत्रित प्रयत्नच फेक न्यूजच्या फैलावावर मात करू शकतात. सोशल मीडिया कंपनीजवळ युजर्सच्या प्रतिक्रियांबद्दल माहिती असते, जी प्रशासनाजवळ नसते, तसेच कोणा तिऱ्हाईत संशोधकांकरवी माहितीचे प्रसरण कसे होते याचा अंदाज घेता येऊ शकतो. याचाच अर्थ, आपणा सर्वांकडे या अफवांच्या कोड्याबद्दल तुटक-तुटक अशी माहिती आहे आणि फेक न्यूजच्या जाळ्यातून बाहेर पाडण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन तोडगा काढणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावरील फेक न्यूजरूपी अभिशापातून मुक्त होण्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी ठोस पावले उचलणे अनिवार्य आहे. त्यासाठी एखादा मेसेज फॉरवर्ड करण्याआधी मेसेजमधील मजकूर नक्की कोणी लिहिला आहे, याबाबतीत खातरजमा करावी आणि मगच तो पुढे प्रसारित करावा; जेव्हा एखाद्या माहितीमुळे आपण अस्वस्थ होतो, रागावतो किंवा घाबरतो तेव्हा ती माहिती आपल्याला त्रास होण्याच्या उद्देशानेच आपल्यापर्यंत दिली गेली आहे का, हे तपासावे आणि ह्या प्रश्नाचे उत्तर जर होकारार्थी असेल, तर तो मजकूर पुढे पाठविण्याआधी दोनदा विचार करावा; ज्या गोष्टी घडणेच जवळजवळ अशक्‍य असते, त्या गोष्टी सहसा अफवाच असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या माहितीचा पाठपुरावा करावा; फोटो आणि व्हिडीओवर विश्वास ठेवणे सहज सोपे असते. परंतु, हे फोटो आणि व्हिडीओदेखील लोकांना फसविण्याच्या दृष्टीने एडिट म्हणजेच संपादित करता येऊ शकतात. कधी कधी फोटो खरे असतात, पण त्यासंबंधित सांगितली जाणारी कथा मात्र खोटी असू शकते. त्यामुळे अशा फोटोंबद्दल तसेच व्हिडीओबद्दल इंटरनेट माध्यमाद्वारे माहिती काढून त्यांचा उगम नक्की कुठून होत आहे, याची शहानिशा करावी; फेक न्यूजमधील मजकूर शक्‍यतो काही ना काही चुकांनी भरलेला असतो. उदाहरणार्थ, शब्दांची जोडणी, लिहिण्याची पद्धत, आकार, उकार, इत्यादी. म्हणजेच, मेसेजमधील विविध चिन्हे, शब्दांची मांडणी, व्याकरणिक चुका यावरून त्या मेसेजची वैधता लक्षात घ्यावी.

– अॅड. प्रशांत माळी, सायबर कायदा, सुरक्षा तज्ज्ञ

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)