फॅट बर्नर्स का वापरू नयेत ?

फॅट बर्नर म्हणजेच चरबी कमी करणाऱ्या गोळ्यांमुळे शरीराचा उष्मांक वाढतो, पचन कमी केले जाते, व्यायामाशिवाय वजन कमी होते, वाढते असे दावे, अशा गोळ्या बनविणाऱ्या कंपन्या करत असतात.

त्यांच्या मते, फॅट बर्नर्स हे आजच्या समाजामध्ये फारच लोकप्रिय होत आहेत. आजच्या तरुण पिढीतच नव्हे तर मध्यमवयीन व्यक्तींमध्येही फॅट बर्नर्सच्या गोळ्या घेऊन त्यांच्या जाहिरातींमधील युवक- युवतींप्रमाणे शारीरिक कष्टांशिवाय स्लीम दिसण्याची तीव्र इच्छा दिसून येत आहे. दहा दिवसांमध्ये तीन पौंड वजन घटविण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांना अशा मार्गाने वजन घटविण्याने, चामडी बरोबरच आपल्या पचनशक्‍तीवर, स्नायूंच्या क्षमतेवर याचा विपरीत परिणाम होणार आहे, याची यत्किंचितही जाणीव दिसत नाही.

अशा फॅट बर्नर गोळ्या घेतल्याने खरोखरीच चरबी कमी होंते? दोन अडीच हजाराची ही औषधे ग्राहकाला खरच समाधान देतात? भारतात नसेल कदाचित; पण युरोपमधील शास्त्रज्ञ याविषयावर संशोधन करत आहेत! फॅट बर्नर म्हणजे चरबी कमी करणाऱ्या गोळ्यांमुळे शरीराचा उष्मांक वाढतो. पचन कमी केले जाते. व्यायामाशिवाय वजन कमी होते. क्रयशक्‍ती वाढते असे दावे, अशा गोळ्या बनविणाऱ्या कंपन्या करत असतात. हे दावे कितपत खरे आहेत, हे आता पाहू.

क्रयशक्‍ती आणि उष्णतेच्या वहनाचे नियम प्रथम समजून घेऊ या. व्यक्‍ती तितक्‍या प्रकृती! या म्हणीप्रमाणेच प्रत्येक व्यक्‍तीच क्रयशक्‍ती म्हणजे जगण्यासाठी, दिवसभरामध्ये शरीरातून खर्च होणाऱ्या आणि अन्नातून मिळविल्या जाणाऱ्या कॅलरिज्‌, ज्यांचा स्नायूंच्या क्षमतेवर अनुकूल-प्रतिकूल परिणाम होत असतो. क्रयशक्‍तीचा अर्थ समजला की, उष्णतेच्या वहनाचा नियम समजणे अवघड नाही. तुम्ही कमी कॅलरिज मिळविल्या तर तुमचे वजन घटणार आहे. म्हणजे जास्त कॅलरिज मिळाल्या तर वजन वाढणार! याचा अर्थ वजन कमी करावयाचे असेल तर कॅलरिज कमी घ्या! असा होतो, पण कॅलरिजच्या जमा-खर्चाचा फरक शरीराच्या सहनशक्‍तिपलीकडे गेला तर तुम्ही बारीक नव्हे तर हडकुळे दिसाल. भूकबळीची ही अवस्था असेल. कांतीवरील तेज नाहीसे होईल, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे, डोळे खोल जातील. हाडे दिसू लागतील, लोक तुम्हाला, ये क्‍या हालत बना रखी है। कुछ लेते क्‍यो नही? असे विचारू लागतील. तर या कंपन्या म्हणतात की, फॅट बर्नर घेण्याने तुमची क्रयशक्‍ती वाढेल. म्हणजे या गोळ्या तुमच्या कॅलरिज खर्च करतील. महत्त्वाची बाब अशी की, त्याचे प्रमाण तितके जास्त असत नाही. मध्यंतरी एका कंपनीने जाहिरात केली की, त्यांच्या चहाच्या अर्काचा वापर केला तर चार टक्‍के कॅलरिज खर्च होतात. ऐकायला छान वाटते नाही! याचा अभ्यास करताना असे दिसते की, जर तुमच्या क्रयशक्‍तीमुळे दिवसात दोन हजार कॅलरिज खर्च होत असतील. एक पौंड फॅट साडेतीन हजार कॅलरिजची असेल तर दिवसाला ऐंशी कॅलरिजच्या हिशोबाने चौव्वेचाळीस दिवस हा चहाचा अर्क घेतल्यावर तुमची एक पौंड चरबी कमी होईल.एक पौंड चरबी कमी करण्यासाठी दररोजच्या आहारातून तेल, तूप आणि गहू कमी करा आणि पंधरा दिवसांत फरक पहा! एक पौंडापेक्षाही वजन कमी झालेले दिसेल!

पचन कमी करणे, वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवल्याने कॅलरिज कमी होऊन चरबी कमी केली जाते. बहुतेक लोकांना हे नियंत्रण शक्‍य होत नसल्याने कंपन्या जाहिरात करताना आमच्या गोळ्यांमुळे भूक मंदावते! असा सरसकट दावा करताना दिसतात. या गोळ्यांमधील काही घटक तुमची भूक मंद करू शकतात; पण त्यासाठी भूक लागल्यावर भरपूर पाणी पिणे, तंतुमय आहार घेणे, कमी कॅलरिज असलेले अन्न उदाहणार्थ भाकरी, उसळी, पालेभाज्या अशा आहारांतून कॅलरिजचे प्रमाण कमी होते, प्रोटिन्सचे प्रमाण वाढते आणि वजन कमी होण्यास मदतही होते.

व्यायामाशिवाय चरबी कमी होते : कंपन्यांचा हाही दावा असतो की, व्यायामाशिवाय तुमचे वजन कमी होईल, हे शक्‍य आहे;मात्र दीर्घकालीन विचार करता शरीरासाठी हे घातक ठरू शकते. स्नायू आणि चरबी असे वेगळे वेगळे वजन कमी होत नसते. ज्यावेळी व्यायामाशिवाय वजन कमी होते त्यावेळी स्नायूंची शक्‍तीही नष्ट होत जाते. मात्र वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत तुम्ही व्यायामाची जोड दिली तर शरीराला स्नायू बळकटी राखण्याचा संदेश मिळतो. महत्त्वाचे हेच की, व्यायामशिवाय वजन कमी करणे म्हणजे शरीराची नासाडी करणे आहे.

शक्‍ती आणि दृष्टी : वजन कमी करण्याच्या औषधांमुळे दुप्पट जोम आणि विचार करण्याची नवी दृष्टी मिळेल, असेही या कंपन्या सांगतात. खरे तर या दोन्ही गोष्टी मानसिकतेशी निगडीत असतात. आपण सडपातळ दिसलो तरच, स्मार्ट दिसणार आहोत! या विचारानेच तर लोक ही औषधे घेत असतात. कृष शरीर म्हणजेच सडपातळ शरीर अशी केवळ भावना झाल्याने मनुष्याला दुप्पट जोम येणे शक्‍य आहे?

व्यायामानंतर होणारा मोकळा श्‍वास, उल्हसित होणारे, मनाला येणारा शांतपणा, वाढलेला आत्मविश्‍वास ज्यांनी अनुभवला आहे, तेच हे जाणू शकतात की, खरी शक्‍ती जोम हे सगळे व्यायामाशी निगडीत आहे. आता आपण स्वाभाविकपणे विचारणार की, ही औषधे मग घेऊच नयेत काय? व्यायाम करण्यासाठी लागणारा वेळ देण्याची आजकाल फार कोणाची तयारी नाही.

आपल्या सौंदर्य, स्मार्टनेस आणि सुखाच्या कल्पनाच मुळी चुकीच्या गृहितकांवर आधारित आहेत. एखाद्या गोऱ्या, सडपातळ शरीराला पाहिले, ते आवडले की, आपण त्यालाच सुंदर किंवा स्मार्ट ठरवतो. त्याप्रमाणे आपण दिसावे अशी स्वप्ने पाहातो आणि त्यासाठी कसलेही कष्ट न करता पैसे फेकून ते मिळावे, अशी अपेक्षा करतो. बाजारात आपल्या स्वप्नांची इनकॅशमेंट करणारी मंडळी आहेतच. ते आपल्याला सडपातळ दिसण्याचे, गोरे दिसण्याचे इन्स्टंट मार्ग सांगतात. आपण त्याला भाळतो आणि शरीराची न भरून येणारी नासाडी करून घेतो. सडपातळ दिसण्याच्या औषधांमुळे शरीरातील पाण्याची पातळी खालावल्याने, लघवीच्या वाटे हे पाणी निघून जात राहण्याने, किडनीवर याचा परिणाम होऊ शकतो, सकृतदर्शनी वजन कमी होताना दिसते, मात्र, प्रत्यक्षात शरीरातील पाण्याची पातळी अतिशय कमी झालेली असते.

अचानक प्रचंड थकवा येणे, जीभ आत ओढणे, लाळ सुटणे, अंधारी येणे, धडधड वाढणे, कंपवात अशा तात्कालिक परिणामांपासून, चामडी कोरडी पडणे, स्नायू शैथिल्य, अंगावर उष्णतेचे फोड येणे, पापण्या व डोळ्यांचा खालचा भाग काळा पडणे, किडनीचे कार्य बंद पडणे, हार्ट ऍटॅक इथपर्यंत काहीही घडू शकते. मध्यमवयीन व्यक्‍तींमध्ये हे परिणाम लवकर जाणवतात. मग ही औषधे घेऊच नयेत काय? असा प्रश्‍न विचारला जाणे स्वाभाविक आहे. याचे उत्तर असे आहे की, नियमित व्यायाम, पोटभर सकस आहार घेणाऱ्या व्यक्‍तींना या औषधांचा अतिशय चांगला अनुभव येतो. शरीराची कसलीही हानी न होता वजन कमी करण्यासाठी भरपूर व्यायाम, भक्‍कम आहार आणि जोडीला जर फॅट बर्नर्स असतील तर, चार महिन्यांत तुम्ही सहा ते आठ किलो वजन कमी करू शकता!!!

तजेलदार कांती, स्वच्छ डोळे ही निरोगीपणाची दिसणारी लक्षणे असून पचनक्षमता, सक्षम रुधिराभिसरण ही स्वत:ला जाणविणारी लक्षणे आहेत. तर चपळता, कार्यक्षमता ही प्रतित होणारी लक्षणे आहेत. मज्जासंस्था ही शरीराची हालचाल करविणारी, भावभावना व्यक्‍त करणारी अशी यंत्रणा आहे. तिच्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या दोषांचे शरीरावर गंभीर परिणाम होत असतात. आपण जे अन्न खातो त्यामधून शरीराला व्हिटॅमिन्स व क्षार जे मिळतात ते प्रामुख्याने या मज्जासंस्थेच्या कार्यासाठी वापरले जात असतात. यावरच या संस्थेचे कार्य आणि क्षमता अवलंबून असते. मज्जासंस्था कार्यक्षम राहण्यासाठी जी व्हिटॅमिन्स काम करतात त्यातील एक महत्त्वाचे व्हिटॅमिन म्हणजे बी कॉम्प्लेक्‍स. व्हिटॅमिन बी 12 हे व्हिटॅमिन मज्जातंतू निर्मिती होण्यासाठी अत्यंत आवश्‍यक असे व्हिटॅमिन आहे. कोबाल्ट घटक असलेल्या या व्हिटॅमिनच्या कमतरतेने मणक्‍यांची झीज होते. बी 9 व्हिटॅमिन म्हणजेच फोलिक ऍसिड, मज्जासंस्थेच्या संदेश वहनामध्ये फोलिक ऍसिडचे कार्य महत्त्वाचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)